यंदाही पूर्ण क्षमतेने गाळप होण्याबाबत साशंकता

विदर्भात कागदोपत्री २० साखर कारखान्यांचे अस्तित्व असले तरी गेल्या काही वर्षांपासून केवळ ६ कारखाने गाळप घेण्याच्या स्थितीत शिल्लक असून राज्याच्या साखरेच्या उत्पादनात विदर्भाचा वाटा नगण्य झाला आहे. यंदाच्या हंगामात या सहाही साखर कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होईल की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

गेल्या हंगामात विदर्भातील पाच खाजगी आणि एका सहकारी साखर कारखान्यातून ८.३८ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले. ८.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. साखरेचा उतारा हा १०.०२ टक्के होता. राज्यात आजपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची चिन्हे असताना विदर्भात मात्र या हंगामात चांगली स्थिती नाही. गेल्या वर्षी विदर्भात ६ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यापैकी ५ कारखाने हे खाजगी होते. यंदाही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८.५० ते ९ लाख मे.टन ऊसाचे गाळप होते. ऊसाची उपलब्धतता मात्र ७ ते ७.५० लाख टनापर्यंतच आहे. केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रातच ऊसाची लागवड आहे. विदर्भात २० कारखान्यांची उभारणी दशकभरापूर्वी करण्यात आली होती, पण मध्यंतरीच्या काळात कारखाने आजारी होऊन बंद पडले. काही कारखान्यांना तर एकाच गाळप हंगामानंतर टाळे लागले. १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने खाजगी उद्योजकांना विकण्यात आले. उर्वरित ६ कारखान्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना एकटा सुरू आहे. सध्या विदर्भातील वसंत सहकारीसह यवतमाळ जिल्ह्यातील डेक्कन शुगर, वर्धा जिल्ह्यातील महात्मा शुगर, भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा शुगर, नॅचरल ग्रोअर्स आणि नागपूर जिल्ह्यातील पूर्ती पॉवर अँड शुगर या खाजगी कारखान्यांमध्ये ऊस गाळपाची क्षमता आहे.

गेल्या हंगामात अमरावती विभागातील दोन कारखान्यांनी २ लाख ७६ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले, तर २ लाख ६५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखरेचा ऊतारा हा ९.६१ टक्के होता. नागपूर विभागातील चार खाजगी साखर कारखान्यांनी ५ लाख ६२ हजार मे.टन ऊस गाळप करून ५ लाख ८६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ऊतारा १०.४३ टक्के होता, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. अमरावती विभागातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता केवळ ५ हजार मे.टन, तर नागपूर विभागातील क्षमता ६ हजार २५० मे.टन इतकीच आहे.

राज्यातील इतर भागात होणाऱ्या ऊसाच्या गाळपाच्या तुलनेत विदर्भातील कारखान्यांची क्षमता नगण्य झाली आहे. २० कारखान्यांची उभारणी करणाऱ्या विदर्भात सहकारी साखर कारखान्यांना दशकभरात घरघर लागली आणि या कारखान्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले, पण या कारखान्यांपैकी काही कारखाने खाजगी उद्योजकांनी आपल्या ताब्यात घेतले, नंतर हेच कारखाने चांगले चालू लागले. सहकारी कारखान्यांच्या भागधारकांमध्ये याचे आश्चर्य आहे.  गेल्या चार वर्षांत विदर्भातील ऊस लागवडीच्या क्षेत्रात १२ हजार हेक्टरहून २० हजार हेक्टपर्यंत वाढ झाली आहे. हे चांगले संकेत मानले जात असले, तरी विदर्भातील कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही, ही शोकांतिका ठरली आहे.

Story img Loader