पावसाने ताण दिल्यामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली. साखरेचे भावही पडल्यामुळे कारखाने अडचणीत आले. कारखाने ऊस नेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उसापासून गूळ तयार करण्यावर भर दिला. मात्र, गुळाचा भावही पडला. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
दरवर्षी लातूर बाजारपेठेतून गुळाची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. खरेदी केलेला माल धुळे, नंदूरबापर्यंत पाठविला जातो. धुळे जिल्ह्य़ात आठवडय़ात सात ते आठ गाडय़ा गूळ पाठविला जात होता. यावर्षी केवळ दोन गाडय़ांवरच तो स्थिरावला आहे. ग्राहकांकडून मागणी नसल्यामुळे गुळाची विक्री होत नाही. सध्या गुळाचा भाव २१०० रुपये प्रतििक्वटल आहे.
साखरेचेच भाव २ हजार ४०० रुपये प्रतिक्विटल असल्याने गुळाचेही भाव वाढणार नाही, असे सांगितले जाते. येत्या काही दिवसांत गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नसल्याने, गोदामात साठवणूक करून व अधिक रक्कम खर्ची घालण्यापेक्षा मिळेल त्या भावाने गूळ विकणे हा पर्याय शेतकरी स्वीकारत आहेत.
यावर्षी उसाचे उत्पादन घटल्यामुळे पहिल्या टप्प्यात गुळाची आवकही ७० टक्के घटली होती. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर ती आवक आणखीन कमी होईल, असा अंदाज होता. अनेक भागांत उसापासून गूळ तयार करणारे उद्योग सुरू झाले आहेत. प्रारंभी गुळाचा भाव २हजार २०० ते २हजार ३०० रुपये प्रतििक्वटल असल्यामुळे भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी गूळ बाजारात पाठविला नाही.
साखरेवरही संकट
साखरेच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी कच्च्या साखरेवर प्रतििक्वटल ४०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे केंद्र सरकारचे अनुदान मिळूनही विदेशात १ हजार ९५० रुपये प्रतििक्वटल दराने कच्ची साखर निर्यात करणे साखर कारखान्याला परवडत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा