साखर कारखान्यांचे कोसळलेले अर्थकारण, ऊसाला कमी भाव आणि साखरेचे दर घसरूनही राज्यात गाळप हंगाम जोरात सुरू असून गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या उत्पादनात २५ टक्क्यांची वाढ आतापर्यंत झाली आहे. राज्यात सध्या हंगाम सुरू असलेल्या १७० कारखान्यांनी ७ कोटी ५३ लाख  टन ऊसाचे गाळप झाले असून, ८ कोटी ४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी राज्यातील ९४ सहकारी आणि ६१ खाजगी, अशा एकूण १५५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. १५ मार्चअखेर तब्बल ४० कारखान्यांना उसाअभावी व इतर कारणांमुळे हंगाम बंद करावा लागला होता. याच कालावधीपर्यंत साखर कारखान्यांनी ५ कोटी ६८ लाख टन ऊसाचे गाळप केले होते, तर ६ कोटी ३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले होते. साखरेचा उतारा ११.२० टक्के होता.गेल्या वर्षीपेक्षा यंदा हंगाम सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या जास्त असून, उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागातील कारखानदारांनी ऊसाला एफआरपीप्रमाणे ऊस दर जाहीर केला नव्हता. साखरेचे दरही घसरले. देशपातळीवरही साखरेचे उत्पादन वाढल्याने राज्यातील कारखानदारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण यंदा खाजगी कारखान्यांसह सहकारी कारखान्यांनी आतापर्यंत हंगाम सुरू ठेवण्याचे धाडस दाखवले आहे.  
 राज्यात यंदाच्या हंगामात ९९ सहकारी आणि ७९ खाजगी, अशा १७८ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. आतापर्यंत ८ कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. या कारखान्यांची गाळप क्षमता दरदिवशी ५ लाख ३२ हजार टन आहे. ७ कोटी ५३ लाख टन ऊस गाळप, ८ कोटी ४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन आणि ११.१५ टक्के उतारा, अशी १५ मार्चपर्यंतची स्थिती आहे. सर्वाधिक ३ कोटी २२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे विभागातील ६० कारखान्यांनी घेतले आहे. सर्वात कमी उत्पादन नागपूर विभागाचे आहे. या विभागात केवळ ४ कारखान्यांनी यंदा हंगाम सुरू केला. चारही कारखाने खाजगी आहेत. त्यांनी आतापर्यंत केवळ ४ लाख ५१ हजार क्विंटल साखर तयार केली आहे. अमरावती विभागाचीही स्थिती अशीच असून, या विभागात एका खाजगी आणि एक सहकारी अशा दोन कारखान्यांनी ४ लाख ६९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अमरावती विभागाचा उतारा १०.२२ टक्के, तर नागपूर विभागाचा १०.७ टक्के आहे. विदर्भातील सहकारी कारखानदारी पूर्णपणे मोडकळीस आली असून केवळ यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी
   साखर कारखाना गाळपासाठी
शिल्लक आहे. वसंत सहकारीने आतापर्यंत २ लाख १५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून २ लाख १४ हजार क्विंटल साखर
तयार केली आहे.

विभागनिहाय ऊसाचे गाळप (लाख मे.टन)/ उत्पादन (लाख क्विंटल) १५ मार्चअखेर कोल्हापूर- १७७.९०/२२१.०२, पुणे- २९४.३०/३२२.१७, अहमदनगर- १०३.७२/११३.४०, औरंगाबाद- ६६.७३/६७.०१, नांदेड- १०२.१७/१०७.९८, अमरावती ४.५९/४.६९, नागपूर ४.४८/४.५१. एकूण राज्य ७५३.८९/८४०.७८

Story img Loader