ऊस दरवाढप्रश्नी पंतप्रधानांसोबत झालेली बोलणी निष्फळ ठरल्याने बुधवारी या आंदोलनाने सर्वत्र उग्र रूप धारण केले. विशेषत: या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. सातारा, सांगलीच्या अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. पुणे-बंगलोर महामार्गासह या जिल्ह्य़ातून जाणारे अन्य सर्वच रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने या भागातील दळणवळण पूर्णपणे थंडावले होते. अनेक वाहने दगडफेक करत पेटवून देण्यात आली. सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातही हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे प्रवाशांना जागोजागी अडकून राहावे लागले. या भागातून जाणारी मालवाहतूकही रोखली गेली आहे.
पंतप्रधानांना राज्याचे शिष्टमंडळ भेटून आल्यानंतर बुधवारी कराड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर ऊस दराचे आंदोलन उग्र करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केल्यानंतर सर्वत्र आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलकांनी जागोजागी रस्ते अडवले. वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यामध्ये एसटी आणि सरकारी वाहनांना लक्ष्य करण्यात आले.
कोल्हापूर येथे रेणुका-पंचगंगा साखर कारखान्याचे शेती कार्यालय पेटवून देण्याबरोबर दोन ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेकीचा प्रकार घडला. ऊसदर आंदोलनाचे लोण सांगली जिल्ह्य़ातही सर्वत्र पसरले. यामुळे सांगलीहून कोल्हापूर, कराडच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद पडली होती.
प्रवासी अडकले दिवसभराच्या या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातून पुण्या-मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी एसटी बसलाच लक्ष्य केल्याने या गाडय़ांबरोबर हे प्रवासीही जागोजागी अडकून पडले. याशिवाय या भागातून होणारी मालवाहतूकही मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली. अडकलेल्या वाहनांच्या अनेक ठिकाणी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये दूध आणि भाजीपाल्याची वाहतूकही रखडल्याने परिसरातील छोटय़ा-मोठय़ा गावांबरोबरच पुण्या-मुंबईकरांची मोठी गैरसोय होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar protest became violent