फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करावयाची साखर ई-मार्केटमधून उचलण्याचा निर्णय घेतला गेला. तो लोकांच्या फायद्याचा ठरला असून मागील १० महिन्यांपासून ही साखर दर महिन्याला नियमित उपलब्ध होत आहे. या कालावधीत सुमारे ११ लाख लाभार्थ्यांना १४ कोटी रुपयांची साखर वितरित करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या १० महिन्यांत साखरेचे भाव ३१ रुपये ४७ पैसे प्रती किलोहून थेट २३ रुपये ६७ पैशांपर्यंत घसरले आहेत. लाभार्थ्यांना विक्री मात्र सुरुवातीपासून १३ रुपये ५० पैशांनेच होत आहे.
 एनसीडीएक्स ई-मार्केट्स लिमि.मार्फत राज्यातील साखर नियतन उचलण्यास जुलै २०१४ पासून सुरुवात झाली. तत्पूर्वी साखर कारखान्यांत होणाऱ्या लेव्ही साठय़ातून साखर उचलली जात असे. अनेक वेळा साखर कारखाने अडवणूक करत. बहुतेक साखर कारखान्यांवर पुढाऱ्यांचे वर्चस्व असल्याने आणि हे पुढारी सत्तेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार असल्याने प्रशासन कारखान्यांच्या लेव्ही कोटय़ाबाबत कठोर भूमिका घेऊ शकत नसे. परिणामी लाभार्थ्यांना योग्य वेळी साखर मिळत नसे; परंतु आता ही डोकेदुखी संपली असून प्रत्येक महिन्याचे नियतन उचलल्यानंतर ई-टेंडरद्वारे वाहतूक व्यवस्थेचा लिलाव केला जात आहे. हे पुरवठादार प्रत्येक तालुक्याला साखरेचे मासिक नियतन पुरवत असून त्यानंतर त्यांना जिल्हा पुरवठा विभागामार्फत वाहतूक भाडे अदा केले जाते. त्यामुळे पुरवठादारही पैसे लवकर मोकळे करण्यासाठी ई-मार्केटमधून साखर उचलल्यानंतर शक्य तेवढय़ा लवकर संबंधित ठिकाणी पोहोचवतात.
गतवर्षीच्या जुलैमध्ये बीटा एडीबल प्रा. लि. वाराणसी या कंपनीने ४ हजार ६४४ क्विंटल साखर नांदेड जिल्ह्य़ाला पुरवली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ६१४२.६० आणि ४५७३.८५ क्विंटल साखर मुंबई येथील अलायन्स ग्रेन ट्रेडर्स प्रा. लि.ने पुरवली. ऑक्टोबरमध्ये ६०४७.७० क्विंटल साखर नवी दिल्लीच्या डॉ. फ्रोजेन फूड इंडिया प्रा. लि.ने तर नोव्हेंबरमध्ये गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी या कंपनीने ४५७३.०५ क्विंटल साखरेचा पुरवठा केला. डिसेंबरमध्ये पुन्हा मुंबईच्या अलायन्सने ४५७१.७९ तर जानेवारीत पुन्हा गंगाखेड शुगरने ४५७२ क्विंटल साखर पुरवली. फेब्रुवारी, मार्चमध्ये मध्य प्रदेशच्या सूरजमल जयनारायणने ४५७३.५५ क्विंटल साखर पुरवठा केली.
गतवर्षी जुलैमध्ये साखरेचा दर प्रतिक्विंटल ३ हजार १४७ रुपये होता. त्यापोटी १ कोटी ४६ लाख १४ हजार ९८३ रुपये मोजले गेले. तर एप्रिलमध्ये साखरेचा दर २ हजार ३६७ रुपये प्रतिक्विंटल आहे. अर्थात प्रत्येक महिन्यात साखरेचे दर काही ना काही किमतीने घसरले असून एप्रिलपर्यंत ७८० रुपयांनी क्विंटलमागे भाव घसरले आहेत. नांदेड जिल्ह्य़ात एकूण लाभार्थ्यांंची संख्या ११ लाख ९ हजार ७३४ असून त्यात अंत्योदयचे लाभार्थी ३ लाख ५७ हजार ७६१ तर दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांची संख्या ७ लाख ५१ हजार ९७३ आहे. जिल्ह्य़ाची प्रतिमाह साखरेची गरज ४ हजार ५७५ क्विंटल असून प्रतिव्यक्ती ४१२ ग्रॅमप्रमाणे १३ रुपये ५० पैसे दराने साखरेचे वितरण केले जाते. अर्थात किमान ५० टक्के नुकसान सहन करून शासन गोरगरिबांना साखर उपलब्ध करून देत आहे. गेल्या १० महिन्यांत शासनाने १३ कोटी ७६ लाख २९ हजार ६३४ रुपयांची साखर सबसिडीच्या माध्यमातून पुरवल्याचे दिसून येते.

Story img Loader