‘एफआरपी’च्या मुद्दय़ावरून ऊस उत्पादक चिंतेत असतानाच आता साखर उत्पादकांसाठी आणखी एक कडू बातमी आहे. इंधनाच्या उतरत्या दरांचा थेट परिणाम आता साखरेच्या उत्पादनावर होणार असून, त्यामुळे साखरसाठय़ात वाढ होणार आहे. साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझीलने आता इथेनॉलकडून पुन्हा साखर उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतल्यामुळे साखर उत्पादकांसमोर नवेच संकट उभे ठाकणार आहे.
साखरेचे दर जागतिक बाजारपेठेवर ठरत असतात. तद्वत, विदेशातील साखर उद्योगात साखर आणि उपउत्पादन कोणते घ्यायचे याचा निर्णयही परिस्थिती पाहून घेतला जातो. विशेषत: उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा ब्राझील हा देश तर साखरेलाच उपउत्पादन समजून इथेनॉल, डिस्टिलरी उत्पादने, सहवीजनिर्मिती आदी घटकांना प्राधान्य देतो. मात्र, जगभरात इंधनाचे दर कमालीचे घसरू लागले आहेत. प्रतिपिंप १२० डॉलर असे दर असलेल्या तेलाची किंमत ४० ते ४५ डॉलपर्यंत घसरली असून, ही घसरण ३० डॉलर प्रतिपिंप एवढी होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याची धास्ती ब्राझीलमधील इथेनॉल उत्पादक साखर उद्योजकांनी आतापासूनच घेतली आहे. इथेनॉलपेक्षा पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त होणार असल्याने ग्राहकांचा ओढा पेट्रोल, डिझेल वापरण्याकडे असेल. त्यामुळे इथेनॉल उत्पादनास अपेक्षित दर व ग्राहकही मिळणार नाही, याची भीती येथील साखर उद्योगाला सतावू लागली आहे. या समस्येवर मार्ग म्हणून ब्राझीलमधील साखर उद्योजकांनी उसापासून इथेनॉलचे उत्पादन घेण्याऐवजी पुन्हा साखर उत्पादनास प्राधान्य दिले आहे. या साऱ्यांमुळे यंदा साखरेचे जागतिक उत्पादन वाढणार आहे. या साऱ्यांचा परिणाम पुन्हा साखरेचे दर कोसळण्यात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रावर परिणाम काय?
*साखरेची उपलब्धता वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर घसरतील. परिणामी मागणी कमी- पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील ऊस उत्पादकांना साखरेचे रास्त दर मिळणार नाहीत. यंदाचा ऊस गळीत हंगाम जवळपास निम्मा संपला आहे.
*तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे देयके मिळत नसल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे.
*‘एफआरपी’प्रमाणे रक्कम देण्याची सक्ती झाल्यास यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांना कोटय़वधी रुपयांचे आíथक नुकसान सोसावे लागणार आहे. शिवाय दुसरीकडे साखरेचे दर घसरत चालल्याने साखर उद्योगातील बेचनी वाढत चालली आहे.
 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar stock to rise brazil to turn to sugar production