सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या साखर अडविण्याच्या आंदोलनामुळे साखर चोरीचे नवे प्रकार समोर आले असून याबाबत जीएसटी व आयकर विभागाकडे तक्रार करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगितले. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा पुन्हा शुक्रवारपासून सुरू झाली असून आज ही पदयात्रा कसबे डिग्रज येथे आली होती. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजू शेट्टी म्हणाले की, मागील हंगामातील देणे मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत आणि कारखान्यातून साखर बाहेर काढू दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. कारखान्यातून विक्रीसाठी बाहेर जात असलेली साखर अडवत असताना साखर चोरीचे काही प्रकार समोर आले असून याचे पुरावे मिळविण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. साखर चोरीचे पुरावे उपलब्ध होताच, याबाबत जीएसटी व आयकर विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात येतील.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर, दरे गावाला भेट

हेही वाचा – एल्विश यादव प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांना प्रत्युत्तर देत म्हणाले…

मागील हंगामातील ४०० रुपये मिळाले नाहीत म्हणून आमची दिवाळी जर शिमग्यासारखी झाली तर कारखानदारांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. भडक व हिंसक आंदोलनाविना सरकारला जाग येत नाही, मात्र, आम्ही कारखानदाराचं नाक दाबत असल्याने कारखानदारच सरकारला सांगतील. यामुळे शासनाला हस्तक्षेप करावाच लागेल. आता कोल्हापुरातील कारखानदार तोंड उघडू लागले आहेत.
शेतकर्‍यांच्या आंदोलनाची ना सरकार दखल घेते, ना विरोधक. कारण या सर्वांचे साखर कारखाने असून त्यांना मिळून शेतकर्‍यांचे बाराशे कोटी रुपये वाटून खायचे आहेत, अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar theft exposed due to swabhimani movement says raju shetty ssb