सोलापूर : यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात उसाचे उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र दिसत असतानाच अवकाळी पावसामुळे उसाचे फड पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ऊततोड यंत्रणाच जवळपास ठप्प झाली आहे. येत्या ८ ते १५ दिवसांपर्यंत हीच स्थिती राहणार असल्यामुळे त्याचा फटका साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक ऊस उत्पादन आणि साखरेचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापुरात यंदा चालू नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात १३ सहकारी आणि २६ खासगी अशा एकूण ३९ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात यंदा दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली तरीही दुष्काळजन्य संकटामुळे ऊस उत्पादन सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत घटल्यामुळे साखर कारखानदारांवर ऊस घेण्यासाठी शेतक-यांच्या बांधावर जाण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ऊसदर देण्याची स्पर्धा सुरू असतानाच जिल्ह्यात सार्वत्रिक अवकाळी पावसाने पिके व फळबागांचे नुकसान झाले. उसाच्या फडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी तळय़ाचे स्वरूप आल्याने बहुतांश भागात ऊसतोडणी यंत्रणा जागीच थांबली आहे.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा आदी भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला असून पंढरपुरात पुळूज, कासेगाव, पटवर्धन कुरोली आदी भागातही जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथील उसाच्या फडामध्ये मोठय़ा प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विशेषत: काळय़ा रानात तर अधिक दयनीय स्थिती दिसून येते. त्यामुळे तेथील ऊसतोड यंत्रणा थांबली असून परिणामी साखर कारखान्यांच्या दैनंदिन गाळपावर परिणाम झाला आहे. चिखलामुळे ऊसतोड यंत्रासह वाहन उसाच्या फडात जाऊ शकत नाही. तोडलेला ऊस डोक्यावर वाहून फडाबाहेर वाहनापर्यंत न्यायला ऊसतोड मजुरांना जादा पैसे द्यावे लागतात. चिखलात ऊस वाहतुकीचा ट्र?क्टर रुतून बसला तर तो ओढून बाहेर काढण्यासाठी जेसीबी यंत्रणेची मदत घ्यावी लागते. त्यासाठीचा जादा आर्थिक भुर्दंड शेतकरी सोसू शकत नाहीत.

हेही वाचा >>>“२००४ ला भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी…”, वाजपेयी-महाजनांचा दाखला देत प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील नारायण चव्हाण यांच्या शेतात साडेनऊ एकर क्षेत्रात ऊस आहे. उसाची तोडणी सुरू असतानाच अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे सुमारे ४५० टन उसाची तोड थांबली आहे. अजून किमान १५ दिवस तरी हीच स्थिती असेल, याची चिंता चव्हाण यांना वाटते.

जिल्ह्यातील एकूण सुरू असलेल्या ३९ साखर कारखान्यांपैकी ३१ कारखान्यांचे ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा तपशील साखर सहसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध झाला असून त्यानुसार कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ५६ हजार ६०० टन एवढी असताना प्रत्यक्षात ९५ हजार ७३२ टन गाळप झाले आहे. म्हणजे दैनंदिन क्षमतेपेक्षा ६० हजार ८६८ टन ऊस गाळप घटल्याचे दिसून आले. त्याचे प्रमुख अवकाळी पाऊस असल्याचे मानले जाते.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आणि तुळजापूर हे पाच तालुके कार्यक्षेत्र असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यात एरव्ही दररोज सुमारे आठ हजार टन ऊस गाळप होतो. परंतु अवकाळी पावसामुळे ऊसतोड थांबल्याने सध्या दररोज पाच हजार मे. टन गाळप होत आहे. उसाच्या फडात चिखलामुळे ऊसतोड यंत्र आणि ऊस वाहतुकीचा ट्र?क्टर जाऊ शकत नाही. केवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊस फडातच ऊस तोड होत आहे. –धर्मराज काडादी,ज्येष्ठ संचालक, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर