उसाला उत्पादन खर्चाच्या आधारेच हमीभाव मिळाला पाहिजे असे मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. साखरेची किंमत वाढणार नाही तोवर हा प्रश्न सुटूू शकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते.
देशात उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी ८६ टक्के साखर ही औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. तर उरलेली १४ टक्के साखर घरगुती वापरासाठी वापरली जाते. असे असूनही केवळ सामान्य माणसाला महागाईच्या झळा बसू नयेत म्हणून साखरेचे दर कमी ठेवले जातात. देशात जोवर औद्योगिक वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या साखरेचे भाव वाढणार नाही तोवर उसाला चांगला दर मिळू शकणार नाही असे आ. जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारापेठेचा विचार केला तर जगभरात सर्वात स्वस्त साखर ही भारतात बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शीतपेय बनवणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्या आणि फार्मसी कंपन्या आपल्या देशात येत आहेत. अत्यल्प दराने साखर घेऊन या कंपन्या आपली उत्पादने तयार करत आहेत. त्यानंतर ती परदेशात चढय़ा दराने विकत आहेत. त्यामुळे अशा औद्योगिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेची किमत वाढवली गेली पाहिजे. यामुळे ऊस उत्पादकांना चांगला भावही मिळू शकेल आणि ऊस कारखानेही तोटय़ात जाणार नाही. मात्र उसाचे दर आणि साखरेचे दर यात जाणीवपूर्वक तफावत ठेवण्याचे काम काँग्रेसप्रणीत सरकार करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
साखर कारखान्यांच्या अर्थकारणामुळे हा प्रश्न चिघळला आहे. जोवर उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर आणि उसाला भाव दिला जाणार नाही तोवर हा प्रश्न असाच चिघळत राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र दोन्हीच्या दरांमधील तफावत कायम ठेवायची, साखर कारखाने बंद पाडायचे, आणि नंतर बंद पडलेले सहकारी साखर कारखाने अत्यल्प किमतीत विकत घ्यायचे हा उद्योगच राज्य सरकारमधील काही नेत्यांनी सुरू केला असल्याचा आरोप शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.