उत्पादित साखरेपैकी बहुतांश साखर आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स व स्वीट उत्पादकांना लागत असून, अशा उत्पादनांवर अधिभार लावण्याची तसेच, साखरेचा किमान दर ठरविण्याबरोबरच इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतल्यास साखर उद्योगाला स्थैर्य तर, ऊस उत्पादकाला न्याय मिळेल असे प्रतिपादन जयवंत शुगर्सचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
जयवंत शुगर्सच्या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ. सुरेश भोसले व उत्तरा भोसले या उभयतांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, जगदीश जगताप, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे कार्यकारी संचालक एस.एस. कापसे, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. जी. देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की बळीराजाच्या हितार्थ साखर उद्योगाच्या विकासासाठी सरकारने नवे धोरण लागू केल्यास ऊस उत्पादकांना निश्चितच चांगले भवितव्य लाभेल, त्यात व्यापाऱ्यांसाठी साखरेचा दर स्वतंत्र रहावा, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळावे, साखरेपासून तयार होणाऱ्या उत्पादनांना अधिभार लागू व्हावा अशा पध्दतीने  सरकारचे नवे धोरण लागू झाल्यास त्याचा सर्वानाच यथायोग्य लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला. ऊसदराची आंदोलने सातत्याने होत असल्याने नवे सरकार याप्रश्नी सकारात्मक तोडगा काढण्याची शक्यता आहे. त्यात सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे अभ्यासू नेतृत्व उचित निर्णय घेईल, असाही विश्वास त्यांनी दिला.
डॉ. अतुल भोसले यांनी आता तुमचे आमचे चांगले दिवस आले असून, आम्हाला ताकद देणाऱ्या लोकांना आम्ही सदैव भक्कम पाठबळ देऊ, असा विश्वास दिला. सत्ताधारी भाजपची संपूर्ण शक्ती आपल्या पाठीशी असून, आता चांगल्या लोकांचा विजय असे राजकीय चित्र असेल  असे मत त्यांनी व्यक्त केले.

Story img Loader