ऊसदराचे रस्त्यांवरील हिंसक आंदोलन थांबवण्याचे संकेत शेतकरी संघटनांकडून मिळाले असले तरी पहिली उचल २ हजार ५०० रुपये घेण्यावरून शेतकरी संघटनांत मतभेद असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २ हजार ५००पेक्षा अधिक दर देणाऱ्यांची ऊस वाहतूक रोखणार नसल्याचे स्पष्ट केले असताना शरद जोशी व रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनांनी मात्र ती उचल अमान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या दोन्ही संघटनांनी या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करून सांगली येथे २१ नोव्हेंबरला होणाऱ्या ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचे नमूद केले आहे. तर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाच्या नियोजनामध्ये शिवसेनानेते मग्न असल्यामुळे या पक्षाची पहिल्या उचलीबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
इस्लामपूर येथे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साखर कारखानदारांची बैठक होऊन त्यामध्ये पहिली उचल २ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय झाला होता. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २ हजार ५०० दर मिळणार असेल तर उसाची वाहतूक रोखली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत खासदार शेट्टी म्हणाले, २ हजार ५०० रुपयांचा निर्णय घेताना कोल्हापूर व सांगलीतील कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते. साताऱ्याचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्यांचा निर्णय समजू शकलेला नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतला आहे. तथापि या प्रश्नावर संघर्ष करायचा नाही, अशी भूमिका आहे. उसाला योग्य किंमत येईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावे असा आपला आग्रह राहणार आहे. तर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी २ हजार ५०० रुपयांच्या उचलीमुळे रक्तपात थांबणार असेल तर हा दर शेतकऱ्यांना मान्य असल्याचे सांगितले.
दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी २ हजार ५०० रुपयांची पहिली उचल अमान्य असल्याचे सांगितले. मराठवाडय़ातील खासगी कारखाना २९०० रुपये दर देऊ शकत असेल तर जादा उतारा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी त्याहून अधिक दर दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनीसुद्धा उसाला पहिली उचल २ हजार ५०० रुपये घेण्यास सक्त विरोध दर्शविला आहे. साखर कारखानदार शेतकऱ्यांची नागवणूक करीत आहेत. सांगली येथे २१ नोव्हेंबरला शरद जोशी, राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.
शिवसेनेने ३ हजार रुपये द्यावेत यासाठी आंदोलन केले होते. मात्र कारखानदारांनी दिलेला २ हजार ५०० रुपयांचा निर्णय शिवसेनेला मान्य आहे की नाही याबाबत निश्चित भूमिका स्पष्ट झालेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश सर्व जिल्हय़ांत पाठवण्याचे नियोजन सुरू असल्याने सेनानेते यामध्ये व्यग्र आहेत. त्यामुळेच आत्ताच शिवसेनेची भूमिका जाहीर करता येणार नाही, असे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी स्पष्ट केले आहे.
ऊसदरावरून संघटनांमध्येच मतभेद
ऊसदराचे रस्त्यांवरील हिंसक आंदोलन थांबवण्याचे संकेत शेतकरी संघटनांकडून मिळाले असले तरी पहिली उचल २ हजार ५०० रुपये घेण्यावरून शेतकरी संघटनांत मतभेद असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
First published on: 20-11-2012 at 05:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane rate disagree between unions