ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि साखर कामगारांचे नेते साथी किशोर पवार (वय ८६) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. साथी किशोर पवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून किशोर पवार आजारीच होते. अस्वस्थ वाटू लागल्याने महिन्यापूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि प्रकृती खालावल्याने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
किशोर पवार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९२६ रोजी नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव येथे झाला. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेल्या किशोर पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात सहभाग घेतला. आणीबाणीविरोधी लढय़ात त्यांनी १८ वर्षे तुरुंगवास भोगला. मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामामध्येही ते सहभागी झाले होते. सीमाभागातील मराठी जनतेच्या वेदनेशी सतत नाते जोडणाऱ्या किशोर पवार यांनी सीमा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीसाठी किशोर पवार म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत होते. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रा. मधू दंडवते, डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या मार्गदर्शन आणि सहवासात तत्कालीन समाजवादी पक्षाची आंदोलने आणि निवडणुकांमध्ये त्यांनी आपले तन-मन-धन वेचले. सर्वच समाजवादी संघटनांसाठी ते आधारवडाची भूमिका पार पाडत.
बॅ. नाथ पै यांच्याविषयी किशोर पवार यांच्या मनात एक विशेष हळवा कोपरा होता. आपल्या घराला ‘नाथ’ असेच नाव देणाऱ्या किशोर पवार यांनी बॅ. नाथ पै यांच्या मृत्यूनंतर कोकणातील सर्व समाजवादी साथींना मायेचा आधार दिला. नगर जिल्ह्य़ात जन्मलेल्या किशोर पवार यांनी स्वत: कोकणातून दोनदा विधानसभा निवडणूक लढविली होती. बॅ. नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये पडद्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे किशोर पवार मात्र, आमदार होऊ शकले नाहीत. मात्र, सत्तेत राहून काम करण्यापेक्षाही सत्तेबाहेर राहून कार्यरत राहणारे किशोर पवार यांची साखर कामगारांचे नेते अशीच ओळख होती. कोपरगाव तालुका साखर कामगार सभा, बारामती साखर कामगार सभा यांचे नेतृत्व करताना त्यांनी हिंदू मजदूर सभेला भक्कम आधार दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कामगार प्रतिनिधी मंडळामार्फत सर्व विचारांच्या साखर कामगारांना न्याय मिळवून दिला. अखिल भारतीय साखर कामगार समन्वय समितीचे संयोजक या नात्याने राष्ट्रीय पातळीवरील साखर कामगारांचे प्रश्न सोडविताना त्यांनी शेती महामंडळाच्या कामगारांसाठीही अविश्रांत परिश्रम घेतले. आयुष्याच्या उत्तरार्धात आपली श्रद्धास्थाने असलेल्या एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्या कार्याचे स्मारक उभे राहात असलेल्या एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि नानासाहेब गोरे अकादमीसाठी साथी किशोर पवार अखंड कार्यरत होते.
एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे दुपारी किशोर पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, मोहन धारिया, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. नीलम गोऱ्हे, मोहन जोशी, उल्हास पवार, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
साखर कामगार नेते किशोर पवार यांचे निधन
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि साखर कामगारांचे नेते साथी किशोर पवार (वय ८६) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. साथी किशोर पवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
First published on: 03-01-2013 at 04:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suger workers leader kishor pawar passed away