महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या चार दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे भंडाऱ्यासोबतच आणि नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द केली असून, डॉक्टरांनी त्यांना ४८ तास सक्त आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या प्रकृती बिघडल्याचे कळताच मंगळवारी पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित नागपुरात दाखल झाले.
 आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या १५ मार्चपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्य़ाचा दौरा आटोपून रविवारी सायंकाळी नागपूरला परतले. चंद्रपूरला असताना वणीला जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन एका रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे सायंकाळी नागपुरात परतले. सोमवारी सकाळी भंडारा जिल्ह्य़ात जाऊन त्या ठिकाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते आणि त्यानंतर मंगळवारी नागपूर जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी दोन्ही जिल्ह्य़ांच्या बैठकी रद्द केल्या.
नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांशी आज सकाळी संवाद साधणार असल्यामुळे अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. बैठक होणार नसल्याचे जाहीर करताच अनेक कार्यकर्ते नाराज झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरे मंगळवारी सायंकाळी यवतमाळला रवाना होणार होते, मात्र बुधवारी सकाळी निघणार असल्याचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी यांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भंडारा, नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी रद्द केल्या असल्या तरी अन्य जिल्ह्य़ांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि अमरावतीची जाहीर सभा होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी तूर्तास उर्वरित दौऱ्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे वणीला पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रविवारी सायंकाळी नागपुरात परतले. रविवारी सायंकाळी डॉ. प्रशांत जगताप यांनी तपासल्यानंतर राज ठाकरे यांना ४८ तास आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी रद्द करण्यात आल्या.
पत्नी, मुलगा नागपुरात
राज ठाकरे यांची प्रकृती बिघडली असल्याचे कळताच मंगळवारी दुपारी १२ वाजता मुलगा अमित नागपुरात पोहोचला आणि दुपारी ४ वाजता पत्नी शर्मिला नागपुरात दाखल झाल्या. डॉक्टरांनी राज ठाकरेंना ४८ तास सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करणार असून, त्यानंतरच उर्वरित विदर्भ दौरा करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांनी देखभाल करण्यासाठी विदर्भातील पदाधिकारी दिवसरात्र त्यांच्या सेवेत आहेत.

Story img Loader