Suhas Kande on Chhagan Bhujbal : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने ठाकलेले सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचं समर्थन सुहास कांदे यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळेच छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नसल्याचं ते म्हणाले. आज ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
सुहास कांदे म्हणाले, “महायुतीत कणीच नाराज नाहीत, एकटे छगन भुजबळ नाराज आहेत. छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं म्हणजे सर्व OBC ना दिलं असा त्यांचा समज आहे. पण मंत्रिमंडळ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की OBC ना न्याय दिला आहे. मला असं वाटतं की एकट्या भुजबळांना दिलं म्हणजे OBC ना दिलं हा गैरसमज आहे. लोकसभेत त्यांनी केलेली गद्दारी आणि विधानसभेला त्यांच्या पुतण्याने केलेली गद्दारी याचं हे फळ आहे.”
“मी जाती-पाती-धर्म-पंथावर बोलणार नाही. पण आंदोलन करणारी विशिष्ट जात आहे. ते लोकच आंदलन करतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे जनतेला दाखवत आहेत, त्याचा महाराष्ट्रातील जनतेवर फरक पडणार नाही. त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला महायुतीच्याविरोधात काम केलं होतं. त्याचं त्यांना फळ मिळालं आहे. तसंच, त्यांचं वयही झालंय. मी महायुतीतील तिन्ही नेत्यांचे आभार मानेन. कारण तिघांनीही OBC ना संधी दिली. ते खरंच ओरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा”, असं आव्हानही सुहास कांदे यांनी दिलं.
हेही वाचा >> नाराज भुजबळांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा, पुढची योजना ठरली? स्वतः माहिती देत म्हणाले…
छगन भुजबळांचा आज मेळावा
छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले, आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करत आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंध ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील”.