दोन्ही पत्नी नांदण्यास येत नसल्याचा राग जन्मदात्या आईवर काढून पोटच्या मुलाने तिचा चाकूने भोसकून खून केला व नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील देगाव रस्त्यावर हब्बू वस्तीत घडली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
शांताबाई शंकर घाडगे (६५) असे खून झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे. तिचा खून केल्यानंतर मुलगा अनिल घाडगे (३८) याने स्वत:च्या खोलीत येऊन छतावरील पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वीच घाडगे यांच्या नातीचा विवाह सोहळा झाला होता. त्यासाठी उभारलेला मंडप अजून तसाच असताना त्यांच्या घरात ही धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण हब्बू वस्ती परिसर हादरला आहे.
मृत शांताबाई यांना दोन मुले असून त्यापैकी अनिल हा मुलगा रंगकाम तथा चित्रकलेचा व्यवसाय करीत असे. त्याचा विवाह मामाच्या मुलीबरोबर झाला होता. परंतु दारूच्या व्यसनातून तो घरात सतत भांडण काढत असल्याने कंटाळून पत्नी दोन मुलांसह पुण्यात माहेरी निघून गेली होती. तेव्हा अनिल याने दुसरा विवाह केला. परंतु दुसरी पत्नीही कंटाळून विजापूरला माहेरी निघून गेली होती. शांताबाई या अनिल याच्या त्रासामुळे दुसरा मुलगा आनंद याच्या घरात राहात असत. आनंद याची मुलगी मोनिका हिचा विवाह पाच दिवसांपूर्वीच पुण्यात झाला होता. लग्नसोहळा आटोपून घाडगे कुटुंबीय सोलापुरात परतले होते. घरासमोरील लग्नाचे मांडव अजून तसेच होते. दरम्यान, आनंद याच्या घरातील सर्वजण उमानगरीत नातेवाईकांकडे गेले असता घरात एकटय़ा शांताबाई होत्या. तेव्हा दारूच्या नशेत आलेल्या अनिल याने त्यांच्याशी भांडण काढले. तुझ्यामुळेच पत्नी नांदण्यास येत नाही, असा आक्षेप घेत अनिल याने चाकूने आईच्या पोटावर, पाठीवर सपासप वार केले. नंतर त्याने स्वत:च्या घरात येऊन आत्महत्या करून स्वत:चा शेवट केला. थोडय़ाच वेळात भाऊ आनंद हा घरात परतला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
चारित्र्याचा संशय घेऊन मुलीसह पत्नीचा खून
चारित्र्यावर संशय घेऊन ऊसतोडणी मजुराने आपल्या पत्नीसह चिमुकल्या मुलीचा गळफास देऊन खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील शेरी येथे घडली. वेळापूर पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून घटनेनंतर फरारी झालेल्या दत्तात्रेय अंकुश बरडे (४४, रा. पारळी, ता. शिरूरकासार, जि.बीड) याचा शोध पोलीस घेत आहेत.
सुशीला दत्तात्रेय बरडे (३५) व तिची मुलगी पूजा (४ महिने) अशी खून झालेल्या मायलेकीची नावे आहेत. या प्रकरणी मृत सुशीला हिची बहीण सविता महादेव बरडे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार वेळापूर शेरी येथील माने-देशमुख यांच्याशेतातील पाण्याच्या चारीत सुशीला व मुलगी पूजा या दोघींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी या संदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास केला असता मृतदेहाच्या न्यायवैद्यक तपासणीअंती सुशीला व मुलगी पूजा यांचा गळफास देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले. मृत सुशीला हिच्या चारित्र्यावर पती दत्तात्रेय हा नेहमीच संशय घेऊन तिला मारझोड करीत असे. ‘जन्माला आलेली मुलगी माझी नाही’ म्हणून संशय घेऊन मारझोड होत असताना सर्व त्रास सहन करीत सुशीला मुलीसह स्वत:ची गुजराण करीत असे. परंतु अखेर याच कारणावरून पती दत्तात्रेय याने पत्नी व मुलीचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वेळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा