नितीन पखाले
यवतमाळ : जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी, शेतीचे झालेले नुकसान, दुबार, तिबार पेरणीचे संकट आणि भविष्यातील आर्थिक समस्या या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा फास जवळ केल्याचे विदारक चित्र यवतमाळमध्ये दिसत आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात २४, तर ऑगस्ट महिन्यातील केवळ १५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असतानाही शेतकरी आत्महत्येचे मळभ अधिक गडद होत आहे. शुक्रवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते.
जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांत १७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी महिन्यात २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारीमध्ये १३, मार्च २४, एप्रिल १३, मे २०, जून ३१, जुलै २४ आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात १८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. यातील केवळ ७७ मृत शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले. ४४ प्रकरणे अपात्र ठरली. ५१ प्रकरणांमध्ये अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
यंत्रणा बांधावर पोहोचलीच नाही
मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी शेतशिवारात जाऊन पाहणी केली. प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. तरीही प्रत्यक्षात यंत्रणा बांधावर पोहोचलीच नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही यवतमाळ जिल्ह्यातील दौऱ्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.