हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात दाताडा बुद्रुक शिवारात एकाच झाडाला अन एकाच दोराने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (३ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रामदास बाळू इंगळे (२४) व शीतल रामदास इंगळे (२२) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे ३ वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील मुळचे रहिवासी असलेले रामदास इंगळे यांनी काही वर्षांपूर्वी दाताडा बुद्रुक शिवारात शेत घेतले होते. त्यामुळे ते आखाड्यावरच रहात होते. ३ वर्षांपूर्वीच रामदासचा विवाह विदर्भातील मडी या गावातील शीतल सोबत झाला होता. ६ महिन्यांपूर्वीच रामदासचे वडील बाळू इंगळे यांचे निधन झाले होते.

दाताडा बुद्रुक शिवारात २ मृतदेह झाडाला लटकलेले आढळले

दरम्यान, ३ महिन्यापूर्वी शितल इंगळे माहेरी म्हणजेच मडी या गावी गेली होती. त्यामुळे शेतातील आखाड्यावर रामदास इंगळे व त्याची आई सरस्वती इंगळे हे दोघेच रहात होते. २ दिवसांपूर्वी रामदास देखील मडी येथे गेला होता. त्यानंतर तो आखाड्यावर आलाच नाही. त्यानंतर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी दाताडा बुद्रुक शिवारातून जात असताना त्यांना एका झाडाला २ मृतदेह लटकलेले दिसले.

पोलिसांकडून तपास सुरू

यानंतर हा प्रकार गावात कळवल्यानंतर गावकरी घटनास्थळी आले. सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वाघजाळी येथील काही गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा मृत व्यक्ती रामदास इंगळे व त्याची पत्नी शितल इंगळे असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली; डॉक्टरचा महापालिकेच्या गेटवरच आत्महत्येचा प्रयत्न

दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत. प्राप्त अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक रंजीत भोईटे यांनी दिली.

Story img Loader