लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अल्पवयीन विवाहित मुलीच्या आत्महत्येची पोलिसांत खबर न देता प्रेताचा परस्पर अंत्यविधी उरकण्यात आल्याच्या घटनेचा गुन्हा अखेर उशिराने माढा पोलिसांनी दाखल केला आहे. यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणी पोलिसांच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, याची विदारक परिस्थिती दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून समोर येत आहे.

माढा तालुक्यातील शिंदे वाडीत घडलेल्या या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलांस दोन दिवसांनी मिळाली खरी; परंतु गुन्हा मात्र जवळपास दोन महिन्यानी दाखल झाला आहे.

आणखी वाचा-सोलापूर : चहासाठी रेल्वेतून खाली उतरणे सराफाला पडले महागात

या संदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत नमूद माहितीनुसार ही घटना माढ्याजवळ शिंदेवाडी गावात २४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री नंतर घडली होती. तनुजा अनिल शिंदे (वय-१४ वर्षे, रा. शिंदेवाडी) हिचे लग्न ती अल्पवयीन असतानाही तिचे वडील अनिल नारायण शिंदे व चुलते सुनील नारायण शिंदे यांनी लावून दिले होते. ती तिच्या नवऱ्याकडे नांदत नसून अन्य दुस-या गावातील एका तरूणाच्या संपर्कात होती. २४ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास तनुजा ही गावाबाहेर कालव्याजवळ अज्ञात तरूणाबरोबर पळून जाताना तिचे चुलते धनाजी शिंदे यांनी पाहिले. तिच्याजवळ थोड्या अंतरावर थांबलेली दोन मुले धनाजी शिंदे यांना पाहून पळून गेली. त्यावेळी धनाजी यांनी तनुजा हिला थांबवून, तू यावेळी येथे काय करतेस, अशी विचारणा केली. त्यावर तिने खोटे कारण सांगितले. तेव्हा धनाजी याने भाऊ सुनील यास बोलावून घेतले आणि तिला मारहाण करून शेतात घरी आणले. नंतर मनःस्ताप होऊन तनुजा हिने विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यास न कळविताच शिंदे कुटुंबीयांनी तिचा परस्पर अंत्यविधी उरकला. त्याची वाच्यता दोन दिवसांनी झाली. तेव्हा गावच्या पोलीस पाटील सुनीता आनंद शिंदे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

आणखी वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गस्त अधिक कठोर करणार

यातील उल्लेखनीय बाब म्हणजे मृत तनुजा ही अल्पवयीन असताना २०२१ मध्ये कुर्डू (ता. माढा) येथील धनाजी शिवाजी जगताप या तरूणाबरोबर तिचे लग्न लावून दिले होते, त्याची माहिती पोलीस पाटील यांना २५ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन करून त्याच गावातील दत्तात्रय शिंदे यांनी दिली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. म्हणजेत यात पोलीस पाटलाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी तनुजाला आत्महत्तेस प्रवृत्त केले. अंत्यविधी परस्पर उरकून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला. तसेच ती अल्पवयीन असूनही तिचे लग्न लावून दिल्याप्रकरणी तिचे वडील अनिल शिंदे, चुलते धनाजी शिंदे व सुनील शिंदे आणि तिचा पती धनाजी शिवाजी जगताप यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करीत असून याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months mrj