चिपळूणच्या आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी आणि शिवसेना शाखेतर्फे संयुक्तपणे आयोजित ६६व्या महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव अजिंक्य पद स्पध्रेत मुंबईच्या सुजन पिलणकरने ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पध्रेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणावर रंगलेल्या या स्पध्रेवर ठाणे व मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. त्यामध्ये पिलणकरने अन्य स्पर्धकांवर मात करत विजेतेपदाच्या चषकावर नाव कोरले. या स्पध्रेचे सांघिक विजेतेपद मुंबई संघाला तर उपविजेतेपद ठाणे संघाला मिळाले.
महाराष्ट्र कुमार गट स्पध्रेमध्ये रायगडच्या प्रतीक धरणे याने प्रथम क्रमांक पटकावला. या गटातील सांघिक विजेतेपद ठाण्याला आणि उपविजेतेपद मुंबई उपनगर संघाला मिळाले.
या दोन प्रमुख स्पर्धाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र मेन्स फिटनेस’ ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली. त्यामध्ये मुंबई उपनगरच्या विजय गणपत हाप्पे याने प्रथम क्रमांक पटकावला.
शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळा कदम, भया कदम, अशोक वाढीवल, कमलाकर पाटील इत्यादींच्या उपस्थितीत स्पध्रेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.