Sujat Ambedkar on Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीत आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानिमित्ता वंचितने प्रचारदौरे आणि सभा घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच, सत्ताधारी अन् विरोधकांवरही तोफ डागली आहे. यावेळी वंचितने थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकर यांनी वाशिममध्ये राज ठाकरेंवर टीका केली. ते उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी वाशिममध्ये गेले होते.
सुजात आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. ते (राज ठाकरे) म्हणतात आम्ही मोठमोठे स्पीकर लावू, भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू. मात्र, त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील”, असं सुजात आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा >> संजय राठोड यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी? पोहरादेवीतील नाराजी दूर करण्यासाठी धर्मगुरूंना आमदारपद!
१५ टक्के मुस्लीम उमेदवार हवेत
“जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्यांच भलं होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. १५ टक्के मुस्लीम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष १५ टक्के त्यांना भागीदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल, त्यांनाच मतदान करून आपल्याला विजय करायचा आहे, असं सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
वाशिम जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देतेय हे पाहावं लागेल.
भाजपाकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
पोहरादेवी (जि. वाशीम) हे देशातील १० कोटींवर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान. यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पुढाकार घेऊन पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा वास्तूसंग्रहालय निर्माण केले. ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमास दोन लाखांच्यावर बंजारा समाजबांधव उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी बंजारा समाजाच्या प्रश्नांबाबत बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदी यांनी त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे या कार्यक्रमानंतर बंजारा समाजात संतापाची लाट उसळली. यामुळे बंजारा समाज विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाण्याचा धोका निर्माण झाल्याने भाजपने थेट या समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांनाच विधान परिषदेवर पाठवून समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.