IAS Sujata Saunik : महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. आजच राज्यातल्या महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी ही बातमी समोर आली आहे.

मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून स्वीकारला पदभार

सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आता त्यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. सुजाता सौनिक यांना एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. कारण जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज (रविवार) संध्याकाळी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रं हाती घेतली.

हे पण वाचा- “येत्या काळात बरेच धमाके होणार, अनेकजण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

पती आणि पत्नीने एक पद भूषवण्याची पहिलीच वेळ

सुजाता सौनिक या राज्यातल्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या निवृत्त सनदी अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. याआधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सुजाता यांचीही याच पदी नियुक्ती झाली. पती आणि पत्नीने एकाच पदावर नियुक्त होणं हे पहिल्यांदाच घडलं आहे. नितीन किरीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीरी यांना कालावधी वाढवून देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांच्या जागी सुजाता सौनिक यांना हा पदभार देण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत सुजाता सौनिक यांचं अभिनंदन केलं आहे.

काय आहे रुपाली चाकणकर यांची पोस्ट?

महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून या राज्याच्या विकासात राजकीय व्यक्तींच्या बरोबरीने प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. परंतु राज्याच्या मुख्य सचिव पदी आजवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नव्हती, आज सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पदी एक महिला विराजमान होत आहे, या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे.सुजाता सौनिक यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्र राज्याची जास्तीत जास्त सेवा घडो ही सदिच्छा…!

सुजाता सौनिक नेमक्या कोण आहेत?

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगढ मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.