Sujay Vikhe Patil Statement on Shirdi Saibhakta : “शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे”, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावरून अनेकविध प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. पण, सुजय विखे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे.
सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
“साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो. मात्र, जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत. जो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. कारण संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं होतं.
राधाकृष्ण विखे पाटलांकडून सारवासारव
“शिर्डीत येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी मोफत प्रसाद मिळाला पाहिजे. पण सुजय विखे यांचं ते वक्तव्य यासाठी होतं की यावर कोणाचंही नियंत्रण नाही. यासंदर्भात काहीतरी नियमावली करावी लागेल. मात्र, साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या प्रसादावर शुल्क आकरण्याची गरज नाही. प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहिल. तसेच साई संस्थानने जे महाप्रसादाचं काम सुरु केलेलं आहे ते कायम सुरु राहिल”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. “शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे स्थानिकांच्याही तक्रारी होत्या. नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडली पाहिजे म्हणून सुजय विखे यांनी तशी भूमिका मांडली. पण मला वाटंत की सुजय विखे यांच्या विधानाचा विपर्यास झाला आहे. मी मान्य करतो की त्यांनी जो शब्द वापरला त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील. पण खरं म्हणजे त्यांचा तसा हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली आहे.
सुजय विखे वक्तव्यावर ठाम
सुजय विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी आणि साईभक्तांनी त्यांच्यावर आगपाखड केली. त्यावर सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. साईभक्त आदरणीयच आहेत. पण पोलिसांकडे नोंद असलेले किती गुन्हेगार भिकाऱ्यांचं सोंग घेऊन तिथे आले आहेत ही आकडेवारी मी जाहीर करणार आहे. कधीही संस्थानकडे प्रश्न घेऊन गेलो की ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे प्रसादातून १० रुपये घेतल्याने जी काही बचत होईल त्याचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आणि त्या भूमिकेवर मी ठाम राहणार.”