Sujay Vikhe Patil : भाजपाने आतापर्यंत १४६ जागांची यादी जाहीर केली असून संगमनेरचीही जागा जाहीर व्हायची आहे. ही जागा महायुतीत कोणाच्या वाटेला जातेय हे पाहावं लागणार आहे. परंतु, संगमनेरमध्ये जागा वाटप झालेलं नसतानाही तिथे थोरात विरुद्ध विखे असा वाद रंगलाय. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला असून समर्थकही एकमेकांविरोधात भिडले आहेत. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काल (२७ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यात जहाल भाषण केलं. टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात सुजय विखेंचं भाषण रंगलं होतं. त्यातच, त्यांनी आचारसंहिता मोडत असल्याची भाषा केली.

जयश्री थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये घमासान शाब्दिक युद्ध रंगलं आहे. त्यातच, दोघांचेही समर्थक एकमेकांवर आगपाखड करत आहेत. सुजय विखे म्हणाले, “तुम्ही आमच्यावर आरोप करता. आमची सहनशीलता आमची कमजोरी समजू नका. आज या तारखेपासून मी आचारसंहिता मोडत आहे. जर उद्या कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात बोललं तर याद राखा टायगर अभी जिंदा है. तिथेच गाडेन”, असा धमकीवजा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला.

हेही वाचा >> Sujay Vikhe Patil : आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!

ग्रामपंचायतीत निवडून येण्याची पात्रता नाही…

“तुम्हाला भाषण करायचं आहे. ज्या लोकांची ग्रामपंचायतीत निवडून येण्याची लायकी नाही, ते आमच्या कार्यकर्त्यांना कुत्रा म्हणतात. काय महाराष्ट्राला सांगता तुम्ही सुसंस्कृत आहात? तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला, संगमनेरसाठी काय करणार आहात यावर बोला. पण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही”, असं सुजय विखे म्हणाले.

सुजय विखे म्हणाले, “कोणालाही घाबरायचं कारण नाही. मतदान गुप्त असतील. बंद पेटीत असतं. ते येतील आणि आमिष दाखवतील. छोट्याश्या आमिषासाठी मुलांच्या भवितव्याशी तडजोड करू नका. मग तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. याच दुष्काळात आणि दहशतीखालील आयुष्यभर जगत राहाल. मला अपेक्षा नाहीय की माझ्यासाठी जाळपोळ व्हावी.”

सुजय विखे संपला तर…

“हे आता तुमच्या हातात आहे. मला जे करायचं ते केलंय. सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. सुजय विखेच्या मागे सगळे हात धुवून लागलेत. पक्षातील, पक्षाबाहेरचे सगळेच. कारण त्यांना माहितेय ज्या दिवशी सुजय विखे संपेल तेव्हा या तालुक्यातील गोर गरीब माणसाची उमेद संपेल. गोर-गरिबांचा आवाज संपेल. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी विकास संपेल”, असंही सुजय विखे म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. त्यांनी थोडावेळ विश्रांती घेऊन पाणी पिऊन पुन्हा आपलं भाषण सुरू केलं.