Sangamner News Update: भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्यानंतर संगमनेर तालुका आणि अहिल्यानगरमध्ये (जुने अहमदनगर) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. देशमुखांचे विधान काल व्हायरल झाल्यानंतर थोरात यांच्या समर्थकांनी सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर हल्ला चढवत काही वाहनांची तोडफोड केली. तसेच वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर सुजय विखेंनीही त्यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. यावर आता सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनी विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कालच्या सभेतून विरोधकांच्या मनातील विकृती दिसली

माध्यमांशी बोलत असताना शालिनी विखे पाटील म्हणाल्या, “सुजय विखे पाटील दक्षिण अहमदनगरमध्ये मागच्या पाच वर्षांपासून काम करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुजय विखेंनी संगमनेरमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. यामुळे याविरोधात काहीतरी करावे लागेल, असा डाव त्यांनी आखला. विरोधकांच्या मनात कालच्या सभेनिमित्त विकृती निर्माण झाली, त्यातून त्यांनी कालचा गोंधळ घातला.”

हे वाचा >> Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप

वसंतराव देशमुखांचा निषेध

दरम्यान वसंतराव देशमुख यांनी जे विधान केले त्याबाबत बोलताना शालिनी विखे म्हणाल्या की, आम्ही त्या विधानाचा निषेधच केला आहे. कोणत्याही महिलेबाबत असे विधान करायलाच नको. त्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्यांच्याकडून चूक झाली असली तरी न्यायालयाचे दार सर्वांसाठी उघडे आहेत. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करायला हवा होता.

जयश्री थोरात माझ्या बहिणीप्रमाणे – सुजय विखे

दरम्यान माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही आज सकाळी कालच्या घटनेवर विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले, काल वसंतराव देशमुख ते विधान करत असताना माझे लक्ष नव्हते. मी माझ्या भाषणाची तयारी करत होतो. माझ्या व्यासपीठावर ती गोष्ट घडली, याचे वाईट वाटते. जयश्री थोरात माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. माझ्या भाषणात मी त्यांचा ताई असा उल्लेख केला होता.

हे ही वाचा >> Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव

कोण आहेत वसंतराव देशमुख?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले देशमुख हे तालुक्यामध्ये थोरात यांचे पारंपारिक विरोधक मानले जातात. सुरुवातीला दिवंगत भाऊसाहेब थोरात, त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ते कायम टीका करत आलेले आहेत. यातून अनेकदा वादावादीचेही प्रकार घडले होते. संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते. मात्र काल सुजय विखे यांच्या सभेचे अध्यक्ष स्थान त्यांना देण्यात आले होते. येथेही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला.