भाजपाचे खासदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मुलगा सुजय विखे यांनी एका सभेत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. “रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत,” असं जाहीर वक्तव्य सुजय विखेंनी एका सभेत केलं. तसेच वेळ आल्यावर हे काय करतात हे सगळ्यांना पुराव्यांसह दाखवेन, असा इशाराही दिला. यानंतर विखेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुजय विखे म्हणाले, “कुणाचं खातं कोणत्या बँकेत आहे, कोण कुठं जातं, कोण रात्री बाहेर पडतं, कुणाच्या घरी जातं हे मला पूर्णपणे माहिती आहे. माझ्याकडे याचं व्हिडीओ शुटिंगही आहे.”
“मी ६ महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं ठेवली आणि…”
“मी ६ महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं ठेवली आहेत. हे काय करतात, काय नाही हे सगळ्या पुराव्यांसह दाखवेन. फक्त त्यांना एकदा उभं राहू द्या,” असा इशारा सुजय विखेंनी दिला. तसेच माझा फार छोटा प्रश्न आहे. हे साडेचार वर्षे कुठं होते, असा प्रश्नही विचारला.
हेही वाचा : नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलली, सुजय विखे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण ?
“आरोप करणाऱ्यांचे कपडेही ठेवणार नाही”
सुजय विखे पुढे म्हणाले, “माझ्याकडे सगळ्यांची उत्तरं आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मी कशी भाषणं करतो. त्यामुळे मला ते सांगायची गरज नाही.” “वेळ आल्यावर सर्व व्हिडीओ दाखवणार आहे. आरोप करणाऱ्यांचे कपडेही ठेवणार नाही”, असाही इशारा सुजय विखेंनी दिला.