भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘आदू बाळ’ असा केला होता. यावर ‘आदू बाळानं सरकारला सळो की पळो केलं आहे’ असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. यावरून भाजपा खासदार सुजय विखे-पाटील आदित्य ठाकरे यांचा टोला लगावला आहे.
सुजय विखे-पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडलं. म्हणून मंत्री पळून गेले. देशातील ही पहिलीच घटना होती. आदित्य ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना भाजपाबरोबर यावं लागलं. आदित्य ठाकरे यांनी असंच करत राहावं. म्हणजे उरलेलेही पळून जातील.”
“आदित्य ठाकरे यांनी आमच्या सरकारला सळो की पळो केलं नाही. तर, ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारमधील लोकांनाच सळो की पळो केलं होतं,” असा टोमणा सुजय विखे-पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा : “सत्ता येते अन् जाते, पण…”, आंबेगावातून शरद पवारांचा वळसे-पाटलांना सूचक इशारा
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“आदू बाळानं सरकारला सळो की पळो केलं आहे. देशात ‘पप्पू’नं सरकारला हलवून सोडलं आहे. माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे. कारण, माझ्या आजोबांचं नावही बाळ होतं. ते माझ्या रक्तात आहे. पण, त्यांच्या भाषेतून तणाव आणि खालच्या पातळीचे विचार दिसत आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावर केली होती.
हेही वाचा : किरण सामंत यांच्या व्हॉट्सअॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…
“आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही”
“ही भाषा नव्या भाजपाची आहे का? आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा ओळखायचो. नवा भाजपा असा असेल, आम्हाला वाटलं नव्हतं. पण, आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.