वाळव्यातील उदार शेतकऱ्याचा पुढाकार

उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचलेला. अन्न-पाण्यासाठी पाखरांची कुतरओढ ही नेहमीचीच. राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशा वेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी येथील वाळवा तालुक्यातील वशी गावच्या सुनील पाटील या शेतकऱ्याने चक्क आपले उभ्या पिकासह असलेले शेत खुले केले आहे. सकाळ-सायंकाळ पाखरांचा थवा चिमणचाऱ्यासाठी या शेतावर अवतरत आहे.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची तगमग चालू झाली, की शासन टँकरची व्यवस्था करते. दुष्काळ पडल्यास पोटाचीही कुणीतरी काळजी घेते. मात्र राना-वनात निसर्गाचा एक घटक असलेल्या पाखरांच्या अन्न-पाण्याची सोय कोण करणार? शहरी भागात अलीकडच्या काळात काही लोक पाखरांसाठी पाण्याची सोय करतात. मात्र रानातल्या पाखरांची कोण काळजी घेणार? त्यांच्या दाण्या-पाण्याचे काय? असा प्रश्न सुनील पाटील यांना गेले अनेक दिवस सतावत होता. यातूनच त्यांनी आपले शाळूचे उभे पीक असलेले शेतच या पाखरांसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याबरोबरच शेतातच पाण्याचीही सोय केली आहे. अन्न-पाण्याची ही अशी सोय झाल्याने, तसेच या साऱ्याला सुरक्षित, आधाराचे, प्रेमळ-मायेचे वलय मिळाल्याने सध्या पाटलांच्या या शेतावर रोज पाखरांची शाळा जोमात भरू लागली आहे.

पाटील यांनी आपल्या दोन एकर शेतात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पीक येईल या पध्दतीने शाळू ज्वारीची पेरणी केली. सध्या शेतातील शाळू पीक काढणीला आले आहे. मात्र काढणी करण्याऐवजी त्यांनी हे पीक पाखरांसाठी राखून ठेवले आहे. रोज पहाटे सूर्योदयाअगोदर पाखरांचे थवेच्या थवे उभ्या पिकावर तुटून पडत असतात. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत रानात किलबिल सुरू असते. मात्र दुपारचे ऊन वाढू लागताच ही पाखरे झाडांच्या सावलीत विसावतात. पुन्हा उन्हं उतरतीला गेली की पुन्हा तिन्हीसांजेपर्यंत या रानात पाखरांची किलबिल सुरू होते.

या अन्नधान्याबरोबर पिण्यासाठी लागणारे पाणीही पाटील यांनी रानातच उपलब्ध करून दिले आहे. यासाठी शेतातील झाडांवर, उघडय़ा जागी प्लॅस्टिकचे कॅन, बादली, मग यांचा वापर केला आहे.

Story img Loader