दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. याप्रकरणी भाजपाचे नेते नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबई पोलीस आता नितेश राणे यांची चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांचा समन्स मिळाल्यानंतर नितेश राणे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी उद्या १२ जून रोजी नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या दाव्यांबाबत मुंबई पोलीस त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. दिशा सालियानचा मृत्यू झाल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता.
हेही वाचा – Worli Hit and Run Case : २३ वर्ष वय असतानाही मिहीर शाहला मद्य का देण्यात आलं? पब व्यवस्थापनाने सांगितले कारण
यासंदर्भात नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी मला समन्स पाठवले आहे, त्यांनी मला उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार मी चौकशीसाठी हजर राहणार आहे, असे ते म्हणाले. तसेच माझ्याकडे जे काही पुरावे किंवा माहिती आहे, ते मी मुंबई पोलिसांनी देणार असून याप्रकरणाच्या तपासात मी पूर्ण सहकार्य करेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरही गंभीर आरोप केले. मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, की दिशा सालियानची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. मात्र, आधीच्या महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले.
दिशा सालियन प्रकरण काय आहे?
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. ८ जूनच्या रात्री मुंबईतल्या मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून २०२० ला दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. त्यानंतर दोन दिवस विलंब का झाला? हा प्रश्न उपस्थित होत होता. दिशा सालियानचा आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली, असा दावा निदेश राणे यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती.