अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत वेगळी चूल मांडली. पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याबरोबर घेत अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. तसेच या गटासह भाजपा आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करत अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाले. या परिस्थितीत राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मात्र अजित पवारांबरोबर जाण्याऐवजी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं. शरद पवारांचा गट महाविकास आघाडीत, विरोधी बाकावर आहे. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर टीका करत आहेत. तर अजित पवारांच्या गटातील नेते रोहित पवारांसह शरद पवारांच्या गटावर टीका-टिप्पणी करत आहेत.
पक्षाचे दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कौटुंबिक वातावरणही बिघडल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे सातत्याने आमने-सामने येत आहेत. तर अजित पवार-रोहित पवार हे काका पुतणेही राजकारणात आमने-सामने येत आहेत. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी फेसबूकवर एक खास पोस्ट लिहिली आहे. सुनेत्रा पवार यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यामुळे सुनंदा पवार यांनी सुनेत्रा पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
सुनंदा पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उद्देशून म्हटलं आहे, माझं सासर-माहेर इथलंय, तुम्ही मराठवाड्यातील. बहुतेक स्त्रियांना सासरच्या पद्धती, संस्कृतीत समरस व्हावं लागतं, तसंच आपणही झालो. अनेक प्रसंग, सण एकत्र अनुभवले. आता आपण दोघींनीही साठी ओलांडली आहे. आपण राजकीय घराण्यात आहोत, चढ उतार, वादळं ही येतंच राहणार. यातूनही आपली वैयक्तिक नाती आपण जपत राहू. सुनेत्रा तुम्हाला साठाव्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
हे ही वाचा >> “आत जे धुमसतंय ते एकदिवस…”, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा; म्हणाले, “इंजिनाची वाफ…”
सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार?
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही चर्चेत आल्या होत्या. कारण, सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांवर पवार कुटुंबातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. या अफवांनंतर बारामतीत नणंद विरुद्ध भावजय (विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार) असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, दोन्ही बाजूच्या नेत्यांनी या अफवांचं खंडण केलं.