नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या १० जागांसाठी आता निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी महाराष्ट्र विधान भवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच त्यांनी पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवरही भाष्य केलं. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते.” दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं की “उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे विजयासाठी वाट पाहावी लागेल. मी त्याबद्दल आत्ताच कोणतंही वक्तव्य करणार नाही.”
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे, माजी आमदार बाबा सिद्दीकी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ आणि परांजपे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच महायुतीतले इतर मित्रपक्ष देखील या उमेदवारीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “अशी कोणत्याही प्रकारची नाराजी आम्हाला दिसलेली नाही. पक्षाने बैठक घेऊन सर्वानुमते माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमचा पक्ष केवळ अजित पवार यांच्या कुटुंबापुरता सीमित झाला आहे अशी टीका होत आहे, त्याबाबत काय सांगाल? त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मी ठामपणे सांगेन की पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.”
हे ही वाचा >> “नेमकं तेच झालं; प्रचारकाळात लोक बोलत नव्हते, पण…”, शरद पवारांनी सांगितलं बारामतीची निवडणूक कशी जिंकली
पार्थ पवार नाराज?
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीबाबत जनतेतून मागणी होत होती. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील अशी मागणी केली होती. मात्र मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की माझ्या उमेदवारीचा अग्रह धरू नये. मात्र त्यांनी माझ्या उमेदवाराची मागणी लावून धरली, खूप मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला.” सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील राज्यसभेच्या उमेदवारासाठी इच्छुक होते. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्जामुळे ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे. यावर सुमित्रा पवार म्हणाल्या. पार्थ पवार यांनी देखील मला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. स्वतः पार्थ पवार यांचा देखील तसाच अग्रह होता.