Sunetra Pawar on Ajit Pawar Becoming Chief Minister : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक निकालांच्या सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? यासंबंधीच चर्चांनीदेखील जोर पकडला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा महायुतीचे उमेदवार अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे आणि महाविकास आघाडीचे नेते युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर या हाय प्रोफाईल मतदारसंघातील लढतीला अजित पवार विरुद्ध शरद पवार असे स्वरूप आले होते. दरम्यान मतमोजणी दरम्यान अजित पवारांनी बारामती मतदारसंघात मोठी आघाडी घेतल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.
अजित पवारांना मत देणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी आभार मानले . त्या म्हणाल्या की, “नेहमीप्रमाणेच मतदार अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, कारण अजित पवारांनी केलेला विकास सर्वांसमोर होता आणि तो त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा होता. त्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासून सांगत होती की आम्ही अजित पवारांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिले. त्यामुळे बारामतीच्या सर्व मतदारांचे मी आभार मानते”.
अजित पवार यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “बारामतीच्या लोकांनी आपलं खरं मत अजित पवारांच्या बाजूने दिलं आहे, मी बारामतीच्या जनतेचे मनापासून आभार मानते. हा विजय जनतेचा विजय आहे, त्यामुळे बारामतीची जनता जल्लोष करत आहे. अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहे. ते पुढील रणनीती आखण्याच्या कामात आहेत”.
लोकांना अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे, याबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “लोकांना जे वाटतं तेच मलादेखील वाटतं. आपल्या माणसांनी मोठ्या पदावर बसावं, असं कोणाला वाटणार नाही? पण हा सगळा आकड्यांचा खेळ आहे, पुढे काय होतं ते पाहूया”.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार रिंगणात होते. बारामती हा गेले कित्येक वर्ष पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. मात्र २०२२ साली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.