प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे. अशातच या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी बळ दिलं आहे. सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या उमेदवार असतील, याचे स्पष्ट संकेत देताना ‘योग्य’ उमेदवार दिला जाईल. त्याला निवडून आणा. तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, याची खात्री देतो, असंही पवार म्हणाले, त्यामुळे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजयमध्ये स्पर्धा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
सुप्रिया सुळे याच महाविकास आघाडीच्या बारामतीच्या अधिकृत उमेदवार असतील. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. अजित पवार गट सुनेत्रा पवारांसाठी या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहे. परंतु, अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांची उमेदवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटप निश्चित होईल. शिंदे गटाला मिळणाऱ्या जागा एकनाथ शिंदे जाहीर करतील. तर अजित पवार गटाला मिळणाऱ्या जागा अजित पवार जाहीर करतील. भाजपाच्या जागा त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर करू शकतात. दरम्यान, राष्ट कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागांवर योग्य उमेदवार दिला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी बारामतीत जनसंपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजेरी लावत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. अशातच बारामतीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यानी बारामतीकरांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत साथ देण्यासाठी साद घातली आहे.
हे ही वाचा >> “लक्षात ठेवा, हे सरकार आम्ही बनवलंय, तुम्ही मात्र…”, बच्चू कडूंचा भाजपाला टोला
सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुमची साथ असेल तर मी लवकरच मोठं पाऊल उचलणार आहे. आपल्या सर्वांच्या भल्यासाठी मी मोठं पाऊल उचलणार आहे. तुम्ही फक्त काही दिवस आम्हा सर्वांसाठी (राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील उमेदवार) काम करायचं आहे. बारामतीकरांनी, बारामतीतल्या सर्व माता भगिनिंनी आणि जनतेने आजपर्यंत अजित पवारांना साथ दिली आहे. सर्वजण नेहमीच अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. तुम्ही इथून पुढेही त्यांच्या पाठिशी उभे राहणार आहात याची मी खात्री बाळगते.