बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज विधानभवनात दाखल होत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अजित पवार गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

२०२४ ची लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. एनडीएने तिसर्‍यांदा सरकार स्थापन केले. आता राज्यसभेचे १० खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या (आरएस) सचिवालयाने सात राज्यांतील १० जागांवर लवकरच निवडणुका होणार असल्याचे अधिसूचित केले आहे. निवडणूक आयोगाने या १० जागांसाठी होणार्‍या निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत. या १० जागांपैकी सात जागा भाजपा, दोन काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) कडे होती. काँग्रेस आणि आरजेडी हे दोन्ही इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या भाजपाच्या राज्यसभा खासदारांमध्ये सर्बानंद सोनोवाल (आसाम), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश) आणि पीयूष गोयल (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. तर, प्रफुल्ल पटेलांचीही एक जागा रिकामी होती. त्यामुळे या जागेवर कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

हेही वाचा >> राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एनडीएसमोर ‘ही’ आव्हाने

या जागेसाठी छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होती. आज याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि इतर मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत विचाराअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे हा सर्वानुमते निर्णय झाला आहे. पक्षात सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करायच्या असतात.”

हेही वाचा >> “सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा”; नेमकी कुणी केली मागणी? वाचा…

भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेत जाणार?

दरम्यान, भाजपाच्या कोट्यातून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. “अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी संख्याबळ कमी आहे. त्यामुळे आता भाजपाच्या मदतीने ते राज्यसभेत जाणार”, असं संजय राऊत आज सकाळीच म्हणाले. महाराष्ट्रातून भाजपाच्या दोन जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे पीयूष गोयल यांच्या जागेवरून राष्ट्रवादीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.