आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट या मतदारसंघातून थेट आमने सामने आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून लढणार आहेत. नणंद-भावजयीमध्ये ही लढत असणार असल्याने अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळेंचं आज नाव जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्याही उमेदवारीची आज घोषणा करण्यात आली. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष होतं. सुप्रिया सुळे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. तर, अजित पवार गटाकडून येथे कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता सर्वांना होती. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच या जागेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत होतं. निवडणुकीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम आणि सभांनाही भेटी देण्यास सुरुवात केली होती. तसंच, जनतेमध्ये जाऊन जनसंवाद वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. तर, दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील लोकांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांविरोधात प्रचार होऊ लागला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे.
हेही वाचा >> ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा
याबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. शिवजयंतीच्या निमित्ताने मी काल (२९ मार्च) मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. दुसऱ्याच दिवशी माझी उमेदवारी जाहीर व्हावी, हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे, हा माझा सर्वांत मोठा सन्मानच म्हणावा लागेल.”
“जिथे जाईन तिथे लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे. त्या उत्साहाला पाहून वाटतं की ते दादांच्या पाठीशी उभे राहतील. जनतेने ठरवलं आहे की मला उमेदवारी द्यायची. आता जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे”, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
विजय शिवतारे बंडाची तलवार म्यान केली आहे
विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी आहे. मात्र एकप्रकारे ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच पाहिली जाते आहे. अजित पवारांना ही जागा राखण्यात यश येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.