राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे बुधवारी (४ जानेवारी) निधन झाले. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मायामी येथे भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७४ वर्षीय देशमुख मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले सुनील देशमुख पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. मात्र, अमेरिकेत राहूनही त्यांना महाराष्ट्रातील मातीची ओढ कायम राहिली आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी मोठं काम केलं.
सुनील देशमुख अमेरिकेत पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांत जुन्या ‘सियारा क्लब’ संस्थेचे सक्रिय सभासद होते. सियारा क्लबमार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचे शिल्पकार म्हणूनही सुनील देशमुख यांना ओळखलं जातं. ते या पुरस्कारासाठीच्या निधी संकलन समितीचे प्रमुख होते. देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील ‘टाइम स्क्वेअर’मध्ये अमेरिकेच्या माजी सचिव हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर ‘फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान मिळाला.
महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम
मराठी भाषा, समाज व संस्कृती याबद्दल सुनील देशमुख यांना विशेष प्रेम व कळकळ होती. हे ऋण फेडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी दिली. तसेच १९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी साहित्य पुरस्कार सुरू केले. १९९६ पासून सामाजिक कार्य पुरस्कार योजनेसाठीही त्यांनी तेवढ्याच रकमेची व्यवस्था केली. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध पुरोगामी चळवळींना आर्थिक सहाय्य केलं.
सुनील देशमुख कोण होते?
सुनील देशमुख यांनी १९६४ मध्ये सांगलीमध्ये दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते बोर्डात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. १९७० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून बी. केम. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले.
अमेरिकेमध्ये त्यांनी एम.एस. (केमिकल इंजिनिअरिंग), एम.बी.ए. या पदव्यांबरोबरच जे.डी. ही कायद्याची पदवीही मिळवली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. नंतर त्यांनी अमेरिकेतच कमॉडिटी ट्रेडर म्हणून वॉलस्ट्रीटवर अनेक वर्षे यशस्वी व्यवसाय केला.
सुनील देशमुख यांना गिरीश, निशा व सुशील अशी तीन मुलं आहेत. सुनील यांच्या पत्नी प्रतिभा आणि तिन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या सुनील देशमुखांना साहित्य व समाजसेवा याविषयी विशेष आस्था होती. त्यामुळेच व्यवसायातून स्वेच्छा निवृत्त घेतल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कामात झोकून दिलं.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाठीराखे
सुनिल देशमुख हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाठीराखे होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या या कामाविषयी त्यांना विशेष आस्था होती. देशमुख यांनी नरेंद्र दाभोलकरांना अमेरिकेत बोलावून त्यांची अनेक भाषणे आयोजित केली होती. त्यांनी डॉ दाभोलकरांना दशकातील उत्कृष्ट कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन १० लाख रुपयांची थैली दिली होती. दाभोलकरांनी हा पुरस्काराचा निधी महाराष्ट्र अंनिसला दिला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला समाजकार्य गौरव पुरस्कार अंनिसला देण्यात आला होता.
“सुनील देशमुख यांनी स्वखर्चाने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक महाराष्ट्रातील १२५०० शाळांमध्ये सुरू केले होते,” अशी माहिती अंनिसचे सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी दिली. तसेच सुनील देशमुख यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आदरांजली वाहिली.