मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे-पाटील बारा दिवसांपासून जालन्यातील अमरावाली सराटी येथे उपोषण करत आहेत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे. अशातच काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणात कुणी ढवळाढवळ करत असेल, तर मान्य करणार नाही, असं सुनील केदार यांनी म्हटलं.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सुनील केदार म्हणाले, “आठ-दहा दिवसांपासून कुणबी समाजाबद्दल उल्लेख होत आहे. कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणात कुणी ढवळाढवळ करत असेल, तर मान्य करणार नाही. समाजाच्या अस्मितेला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर देऊ. तसेच, कुणबी समाजाबद्दल राजकारण केल्यास हाणून पाडू.”
हेही वाचा : सरकारनं मनोज जरांगेंना पाठवला बंद लिफाफा, नेमकं काय ठरलं? अर्जुन खोतकर म्हणतात…
जरांगे-पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. त्याबाबत प्रश्न विचाल्यावर सुनील केदार यांनी म्हटलं, “जरांगे पाटलांचं आम्हाला देणं-घेणं नाही. आंदोलनापेक्षाही आक्रमक भूमिका आम्ही घेऊ. आमच्या अस्मितेला हात लावल्यास सहन करणार नाही.”
हेही वाचा : निजामकाळात मराठवाडय़ात ३८ टक्के कुणबी; हैदराबादहून मिळालेल्या जनगणना अहवालातील नोंद
“हा देश महात्मा गांधींचा आहे. न्यायालयीन लढाईपेक्षा जमिनीवरील ताकद जास्त असते. ती ताकद अजून पाहिली नाही,” असेही सुनील केदार यांनी सांगितलं.