शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या बंडामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या ही दोन तृतीयांश आमदारांपेक्षा अधिक झाली आहे. अगदी रविवारीही शिवसेनेतील आमदारांची गळती सुरु असल्याचं दिसून आलं. मागील चार दिवस तळ्यात-मळ्यात करणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब हे तीनच मंत्री आता शिवसेनेत आहेत. उर्वरित सर्व मंत्र्यांनी गुवाहाटी गाठले आहे. अशातच शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत हे सुद्धा गुवाहाटीला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनिल राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
नक्की वाचा >> बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याने ११ जुलैआधी बहुमत चाचणी होणार की नाही?; सर्वोच्च न्यायालय म्हणालं…
मुंबईमध्ये सुनिल राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही पण गुवाहाटीचं तिकीट काढलंय असं म्हटलं जातंय, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “नाही, मी गुवाहाटीला का जाऊ? जायचं असेल तर गोव्याला जाऊ शकतो. गोव्यात पाऊस पडतोय, समुद्र आहे, निसर्ग सौंदर्य आहे. तिकडे (गुवाहाटीला) जाऊन मी काय करु?, गद्दारांचे चेहरे पहायला जाऊ का?” असं खोचक उत्तर सुनिल राऊत यांनी दिलं.
“मी शिवसेनेचा माणूस आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे हे आमच्या रक्तात आहेत. त्यामुळे दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसाठीच काम करणार. माझ्यासाठी आमदारकी काही मोठी गोष्ट नाहीय. आता जे उरलेत त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रसार करणार,” असंही सुनिल राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> “महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…”, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल; “लाज असती तर…” म्हणत बंडखोरांवर टीका
एका वृत्तवाहिनीवर मी गुवाहाटीला गेल्याची बातमी दाखवली जात आहे म्हणून मी हे स्पष्टीकरण द्यायला समोर आलोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “मी गुवाहाटीला जाऊ शकत नाही कारण माझ्या हृदयात आणि रक्तात शिवसेना आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंसोबत राहील. माझी निष्ठा ठाकरेंशी आहे. मी कायमस्वरुपी शिवसैनिक आहे,” असं सुनिल राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.