शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना धमकी मिळाली आहे. ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप,’ असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना आला आहे. धमकी मिळाल्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार सुनील राऊत यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत विचारले असता सुनील राऊत यांनी सांगितले, “दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाइल नंबर कसा मिळाला? महाराष्ट्रात भरपूर लोक आणि नेते आहेत. मग त्याने संजय राऊत यांनाच धमकी का दिली? सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीररीत्या घेत प्रामाणिक कारवाई करावी.”
“गेल्या सहा महिन्यांपासून संजय राऊत यांना धमकीचे फोन येत आहेत. सातत्याने तक्रार करूनही महाराष्ट्र सरकारने स्टंटबाजी म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही. सरकार आम्हाला सुरक्षा देईल, अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही. पण, सुरक्षा मिळाली नाही तरीही संजय राऊत किंवा आम्ही शिवसेनेचे काम ठामपणे करत राहू,” असे सुनील राऊत यांनी म्हटले.
“सरकारने ४० गद्दार आमदारांसाठी पोलिसांच्या दोन-दोन गाड्या ठेवल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांचे कारचालक आणि भाजी आणणाऱ्या लोकांनाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देणे महाराष्ट्र सरकारला परवडत नसेल,” अशी टीका सुनील राऊत यांनी केली आहे.