शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या लंडन दौऱ्यावर गेले आहेत. मात्र त्यांच्या या लंडन दौऱ्यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे लंडनला जाऊन तिथल्या नालेसफाईची आकडेवारी देणार आहेत का? शेलार यांच्या या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत १०० वेळा जगभ्रमंती केली. त्यांनी हे दौरे कशासाठी केले? ते परदेशात काय करायला गेले होते?
सुनील राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर जात असतील तर यांच्या पोटात का दुखतंय? नरेंद्र मोदी दरवर्षी ५० वेळा परदेश दौऱ्यावर जातात. मग तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात? मला असं वाटतं की शेलार आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला द्यावा की ‘हा आपला देश आहे आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी देशातल्या नागरिकांना जी वचनं दिली होती, आश्वासनं दिली होती, गॅरंटी दिली होती ती पूर्ण करायला हवी. त्यासाठी त्यांनी इथे बसून ते कामं करायला हवीत. उगीच उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायला जाऊ नये.’ नरेंद्र मोदी जगभर फिरतात ते तुम्हाला चालतं. आम्ही त्यावर काही आक्षेप घेतो का? परंतु, उद्धव ठाकरे लंडन दौऱ्यावर गेले तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? त्याऐवजी तुम्ही पंतप्रधानांना जाऊन सल्ले द्या, आम्हाला नको.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले होते की केवळ वर्षा बंगल्यावर बसून कामं होत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला देखील सुनील राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, ज्यावेळी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जात होतं. आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणी विचारतं का? तेच आज कामांबद्दल बोलतायत. मुळात कामं करायला डोक्याची गरज असते. नुसती घरात बसून कामं होत नाहीत एकनाथ शिंदे केवळ वर्षा बंगल्यावर बसून असतात, कारण ते महाराष्ट्रात आणि देशात फिरू शकत नाहीत. त्यांना माहिती आहे ते वर्षा बंगला सोडून दुसरीकडे गेले तर त्यांनी आमचे जे आमदार चोरून नेले आहेत ते आमदार त्यांच्याजवळ राहणार नाहीत. हे लोक त्यांच्याबरोबर किती दिवस टिकून राहतील याबाबत शंका आहे म्हणून ते वर्षा बंगल्यावर बसून पहारा देतात, आमदारांवर लक्ष ठेवतात.