राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. तसंच मागच्या दोन दिवसांपासून अजित पवारही सभागृहात आलेले नाहीत. जहाँ नही चैना.. अशी सूचक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ हे त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे असे तिघेही जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र काही वेळापूर्वी या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले सुनील तटकरे?

छगन भुजबळ यांच्याशी आमची चर्चा झाली होती. नाशिकमधून ते लोकसभाही लढवणार होते. मात्र त्यावेळी उशीर झाला होता. त्यावेळी स्वतः छगन भुजबळ यांनी जाहीर केलं होतं की ते लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. त्यावेळी आमच्या काही चुका झाल्या ज्या आम्ही विधानसभा निवडणुकीत सुधारल्या आहेत त्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळालं. असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेऊ असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याने ते अधिवेशनात आलेले नाहीत त्याचे वेगळे काही अर्थ कुणीही काढू नयेत असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे पण वाचा- “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

छगन भुजबळ कायमच बरोबर होते, आहेत

पक्षाच्या वेळी जे काही निर्णय घेण्यात आले तेव्हा छगन भुजबळ बरोबर होते. नाशिक आणि इतर लोकांना उमेदवारी देण्याबाबत, मंत्रिपदं देण्यातबाबत आमची चर्चा झाली होती. छगन भुजबळ हे त्यांच्या मतदारसंघात कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर संजय राऊत आणि इतर मंडळींचं मनःस्वास्थ्य बिघडलं आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे, लेखांकडे लक्ष देऊ नका त्यात काही अर्थ नाही असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत वेगळं काय बोलणार आणि लिहिणार? त्यांनी छगन भुजबळ यांचं एक दिवस कौतुक केलं असेल पण मागचं दीड-दोन वर्षे काय काय बोलले आहेत आठवून बघा.

येवल्यात जाऊन कोण काय म्हणालं होतं आठवा-तटकरे

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की छगन भुजबळ यांचा सन्मान होता. आता त्यांचा अपमान होतो आहे. याबाबत विचारलं असता तटकरे म्हणाले, छगन भुजबळ आजही अजित पवारांच्या शेजारीच बसतात. मात्र आम्ही जेव्हा एकत्र एक भूमिका घेतली तेव्हा कोण कोण काय काय बोललं? हे सुप्रिया सुळे विसरलेल्या दिसतात. मात्र जनता विसरलेली नाही, येवल्यात जाऊन कोण काय म्हणालं होतं ते पण लोकांना माहीत आहे असंही सुनील तटकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatakare statement on chhagan bhujbal he also gave answer to supriya sule scj