अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे. बारामतीत दादा… दादा… दादा करत ज्यांचं आयुष्य गेलं. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं, असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली होती. याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला, तेव्हा सुनील तटकरेंनी मला…”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

सुनील तटकरे म्हणाले, “सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शरद पवारांविरुद्ध कुठलीही अपात्रतेची याचिका दाखल केली नाही. कारण, शरद पवार हे आमचे दैवत आहेत.”

“अजित पवारांनी ३० वर्षे बारामती शहर उभे केले. दादा… दादा… दादा बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवार यांच्या वयावर बोलण्यापेक्षा…”, सुनील तटकरेंनी दीपक केसरकरांना सुनावलं

“८३ वर्षांचे सतत बोलून किती केविलवाणी सहानभुती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहात?” असा सवालही श्रीनिवास पाटलांवरून सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare attacks supriya sule over shrinivas patil disqulification ssa