राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. जुलै महिन्यात पक्षात उभी फूट पडली. अजित पवारांसह काही आमदार आणि खासदारांनी महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आहे. तर शरद पवारांचा गट विरोधी बाकावर आहे. पक्ष फूटल्यानंतर बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. तसेच, खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंच्या तक्रारीला अजित पवार गटानेही उत्तर दिलं आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधात गेल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील आणि खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शरद पवार गटात एकूण चार खासदार आहेत. त्यापैकी तीन खासदारांविरोधात सुनील तटकरे यांनी तक्रार केली आहे. परंतु, खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात तटकरे यांनी तक्रार केलेली नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर स्वतः सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. सुनील तटकरे म्हणाले, आम्हाला पहिल्या दिवशीच अमोल कोल्हे यांचं समर्थन होतं. आम्ही राजभवनावर शपथ घेतली त्या दिवशी तिथे अमोल कोल्हे उपस्थित होते.

सुप्रिया सुळेंची मागणी काय?

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सुळे यांनी म्हटलं आहे, दहाव्या परिशिष्टानुसार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै रोजी आम्ही याचिका दाखल केली होती. परंतु, चार महिन्यांपासून अद्याप याप्रकरणी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

Story img Loader