लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे महायुतीत जागावाटपाला वेग आलाय. जागावाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी परवाच महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलीय. त्यांनी बारामती या लोकसभा मतदारसंघावरही सविस्तर भाष्य केलंय.

“दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होणार”

सुनिल तटकरे म्हणाले की, परवाची दिल्लीतील बैठक अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. हा निर्धार ठेवून परवाच्या बैठकीत चर्चा झाली. सध्या आमच्यात ८० ते ८५ टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होणार आहे. महायुतीतील मित्रपक्ष आणि आमच्यात कुठेही नाराजी नाही. मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरू आहे.

“सुनेत्रा पवार याच आमच्या उमेदवार”

बारामती या लोकसभा मतदारसंघाची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिलीय. ९ मार्च रोजी जाहीर सभेत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच सुप्रिया सुळेंच्या या उमेदवारीची घोषणा केली. यावरही सुनिल तटकरे यांनी भाष्य केलं. “सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर होणे ही औपचारिकता होती. या जागेवर निवडणूक लढवावी असे आमच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचं मत आहे,” असं तटकरे यांनी सांगितलं. तसेच महायुतीच्या जागावाटपात बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Story img Loader