सत्तेपुढे शहाणपण नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा रायगडकरांना आला. लोकसभा निवडणुकीत एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन पक्ष आज रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र आले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तयार झालेल्या या आघाडीमुळे रायगडातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र सुनील तटकरे यांची विश्वासार्हताही पणाला लागणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेत २००४ पासून शिवसेना शेकाप युती होती. ती अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली. गेल्या १० वर्षांत शिवसेना हा पक्ष शेकापला कधीही जातीयवादी वाटला नाही आणि अचानक लोकसभा निवडणुकीत शिवसेना जातीयवादी असल्याचे शेकापला जाणवले आणि शेकाप सेनेचा घटस्फोट झाला.
आता शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, त्यामुळे विधानसभा निवडणुकीची गणिते यामुळे बदलणार आहेत. शेकापशी जिल्हा परिषदेत युती झाली असली तरी विधानसभेची बोलणी झालेली नाही. असे जरी सुनील तटकरे सांगत असले तरी विधानसभेत शेकापशी युती करणार नाही, असे ठामपणे तटकरे सांगत नाही. तटकरेंच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची मात्र पुरती कोंडी झाली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरविणारे काँग्रेसच्या मधुकर ठाकूर, रवींद्र पाटील यांचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तटकरेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतही प्रचंड नाराजी आहे. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळणारे राजीव साबळे आणि पक्ष प्रतोद महेंद्र दळवी यांनी या निर्णयाविरोधात बंड पुकारले आहे. सुनील तटकरे यांनी पक्षातील सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे. राजकीय स्वार्थापोटी दोन स्वार्थी नेते एकत्र आले असून पक्ष कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत, असा दावा दळवी यांनी या युतीनंतर केला आहे.
२००२ मध्ये शेकाप आघाडी सरकारमध्ये असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शेकापच्या सुप्रिया पाटील यांना मतदान करायचे असे ठरले होते. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यास ठाम विरोध केला व सेनेच्या अपेक्षा कारेकर यांना अध्यक्षपदी मतदान करून निवडून आणले. या प्रकारामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी शेकापने देतानाच सुनील तटकरे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली होती. अखेर सरकारमधील घटक पक्षाला मदत केली नाही म्हणून तटकरे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. एका तपानंतर जिल्ह्य़ातील राजकारणाची कालचक्रे उलटी फिरली असून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकापबरोबर हातमिळवणी करीत विधानसभा निवडणुकीची गणितेच बदलून टाकली आहेत.
 सुनील तटकरे शेकापबरोबर युती करणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होता, परंतु त्यांच्या विश्वासाला यानिमित्ताने तडा गेला आहे. अलिबाग, पेण, पनवेलमधील त्यांचे कार्यकत्रे आज अनेक वष्रे शेकापशी लढताहेत त्याची मात्र या निर्णयाने कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत हाच शेकापक्ष तटकरे यांच्या विरोधात रान उठवत होता हे तटकरे कसे विसरू शकतात? असा सवाल केला जातो आहे. सुनील तटकरे यांनी विधानसभेचा विचार करून शेकापशी हातमिळवणी केली हे आता लपून राहिलेले नाही. या युतीमुळे राष्ट्रवादीच्या कोटय़ातील जागा वाचवण्यात कदाचित यशस्वी होतीलही, पण स्वत:चा पक्ष आणि काँग्रेसमध्ये तटकरे यांची ढासळलेली राजकीय विश्वासार्हता कशी वाचवतील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा