Ajit Pawar Group on Sanjay Raut : भाजपाचं महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरु होतं, हे आता हळू हळू स्पष्ट होत असून अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे राज्यातील मोठे कलाकार आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. २०१९ ची निवडणुकीत जनतेचा कौल झुगारून महाविकास आघाडीची स्थापन झाली, तेव्हा ते कोणाचं कपट होतं? असा प्रश्न सुनील तटकरे यांनी संजय राऊतांना विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

२०१९ मध्ये ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढले आणि त्यानंतर याच संजय राऊतांनी शरद पवारांकडे जात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्याला काय म्हणायचं? मुळात २०१९ ची निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपाच्या युतीला कौल दिला होता. जनतेच्या कौलाला छेद देण्याचं काम संजय राऊतांनी केलं. मग ते कपट कोणाचं होतं? याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलं.

हेही वाचा – ‘माझी लाडकी बहीण’ योजनेला वित्त विभागाचाच विरोध असल्याची चर्चा; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

भाजपाचे नेते गिरीष महाजन यांनीही दिली प्रतिक्रिया

सुनील तटकरेंबरोबरच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनीही संजय राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. मुळात नटसम्राट कोण आहे, कॉमेडी कोण करतं, हे राज्यात सर्वांना माहिती आहे. या राज्यात नकलाकार कोण आहेत? हेदेखील सर्वांना माहिती आहे. त्यामुळे संजय राऊतांनी याबाबत बोलूच नये, त्यांनी सकाळी भोंगा वाजवण्याचं काम करत राहावं, अशी खोचक टीका त्यांनी केली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान, अजित पवारांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याच्या चर्चेबाबत बोलताना, संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर खोचक शब्दांत टीका केली होती. भाजपाचं महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरु होतं, हे हळू हळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. श्रीराम लागूंपासून ते आताच्या प्रशांत दामलेंपर्यंत असे मोठे कलाकार महाराष्ट्राच्या रंगमंचाने दिले आहेत. आपल्या राज्याला नाट्यश्रृष्टीची मोठी परंपरा आहे. मात्र, या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यांनाही नाट्यसृष्टीत सामावून घेतलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.

हेही वाचा – अजित पवार गटाचा आमदार शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर…

हे तिन्ही लोकं उत्तमपणे मेकअप करतात. त्यांचे चेहरे बदलतात. अजित पवार हे एका गुप्तहेराप्रमाणे नाव आणि चेहरा बदलून, खोट्या मिशा लाऊन दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रात्री वेश बदलून रस्त्यावरच्या दिव्या खाली बसून सरकार कसं पाडायचं, यावर चर्चा करत होते. ही फार मोठी गोष्ट आहे. हे लोक मोठे कलाकार आहेत. यांनी राजकारणात येऊन आपल्या नाट्यसृष्टीचं मोठ नुकसान केलं आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare girish mahajan replied to sanjay raut criticism drama ajit pawar amit shah meet spb