जायकवाडीच्या पाण्याबाबत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी कुणालाही विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. जायकवाडीत पाणी सोडण्याचा लेखी आदेशही तटकरे यांनी दिला नव्हता. एवढेच नव्हे तर जलसंपदा सचिव मालिनी शंकर यांनाही या निर्णयाबाबत माहिती नव्हती, असे उघड झाले आहे.
तटकरे यांनी निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांना तोंडी दिला. लेखी आदेशाची प्रत न मिळाल्यामुळे न्यायालयात याचिका सुनावणीला आली नाही. आता बिनतारी संदेशाची प्रत शेतकऱ्यांना मिळाली असून, ते उद्या (गुरुवार) उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
जायकवाडीच्या पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा संघर्ष सुरू झाला आहे. कृषिमंत्री पवार हे श्रीरामपूर तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी आले असता पालकमंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे, नरेंद्र घुले, आमदार शंकर गडाख, चंद्रशेखर घुले आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाणीप्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. ‘दिवाळीपूर्वी बैठक घेऊन हा प्रश्न सामोपचाराने सोडविला जाईल, प्रादेशिक वाद निर्माण करू नका, बैठक झाल्यानंतर जायकवाडीत पाणी सोडायचे की नाही याचा निर्णय होईल. मराठवाडय़ातील नेत्यांशी चर्चा करू,’ असे आश्वासन पवार यांनी दिले होते. दिवाळीपूर्वी ही बैठक होणार होती. पण, मंत्री तटकरे यांनी कुणाशीही चर्चा न करता पाणी सोडले. काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी तर सोडाच, पण राष्ट्रवादीचे मंत्री पिचड यांच्याशीही चर्चा केली नाही, त्यामुळे आता पवार तोंडघशी पडले. पिचड यांनी तटकरे यांना बुधवारी पवारांच्या जाहीर आश्वासनाची माहिती दिली. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्येही धोरणात्मक निर्णय घेताना विसंवाद दिसून आला.
राहाता भागातील शेतकऱ्यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्यासमोर ती सुनावणीला आली असता त्यांनी पाणी सोडण्याच्या लेखी आदेशाची मागणी केली. माध्यमातील वृत्ताला आधार नसल्याने त्यांनी याचिका दाखल करून घेतली नाही.  पिचड, थोरात, विखे या मंत्र्यांनीच मुख्यमंत्री चव्हाण व तटकरे यांच्याकडे लेखी आदेश नसल्याचे बुधवारी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा सचिव मालिनी शंकर यांच्याकडे त्यांनी आदेशाची प्रत मागितली. पण पाणी सोडण्याचा निर्णय माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता तटकरे यांनी मुख्य अभियंता कुंजीर यांना तोंडी आदेश दिला होता, असे सांगितले.

Story img Loader