आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले.
खेड येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत २६-२२ चा फॉम्र्युला निश्चित झाला असला तरी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली असून तेथून तटकरे यांना उमेदवारी देण्याबाबत विचार-विनिमय चालू आहे.  मात्र जागांच्या या अदलाबदलीबाबत दोन्ही पक्षांकडून अजून अंतिम निर्णय होणे बाकी असल्यामुळे त्याबाबत आत्ताच काही तपशील देणे योग्य होणार नाही, अशी पुस्तीही पवार यांनी जोडली.