२०१४ साली ७० हजार कोटी हा शब्दप्रयोग समोर आला. पण, १९५२ ते २०१२ या कालावधीत सिंचन प्रकल्पांवर ७० हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. पण, अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. कारण, अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली होती, असं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.

सुनील तटकरे म्हणाले, “२०१४ मध्ये अजित पवार, छगन भुजबळ आणि माझ्यावर आरोप करण्यात आले. ७० हजार कोटी हा शब्दप्रयोग तेव्हाच समोर आला. मात्र, १९५२ ते २०१२ या कालावधीत सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च झाले होते. जायकवाडी, उजनी, गोसीखूर्द आणि अन्य महाराष्ट्रातील धरणांना ७० हजार कोटी खर्च झाले. त्यातील १५ हजार कोटी आस्थापनं, १७ हजार कोटी भू-संपादन आणि प्रकल्पावर जवळपास ३० ते ३५ हजार कोटी रूपये खर्च झाले.”

“अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली”

“लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आली. महाराष्ट्रातील कृषीमालाचं उत्पादन वाढलं. पण, अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. कारण, अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली होती” असं तटकरेंनी सांगितलं.

“भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही राष्ट्रवादीनं जाहीर केला”

“२०१४ साली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच मला आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत घोषित करण्यासाठी सांगितलं. भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही राष्ट्रवादीनं जाहीर केला. महाराष्ट्रात तेव्हा सरकार स्थापन झालं. त्यानंतर ‘मी अलिबागला बैठक’ बोलावल्याचा दावा कुणीतरी केला. पण, ती बैठक मी नव्हती, तर शरद पवारांच्या सांगण्यानुसार पराभूत आणि विजयी उमेदवारांचं शिबीर बोलावण्यात आलं होतं,” असं तटकरेंनी म्हटलं.

Story img Loader