Sunil Tatkare On Raigad Guardian Minister : महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही आहे. जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती, तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र, यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय. यातच आच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या तिढा सुटेल अशी चर्चा आहे.

यातच अमित शाह हे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यामुळे सुनील तटकरेंच्या घरी पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अमित शाह यांच्याबरोबर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली का? तसेच राजकीय काही चर्चा झाली का? नेमकं काय ठरलं? याबाबतची माहिती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी कशा प्रकारे समावेश होईल? यासाठी आमची चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांचा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद होता. अमित शाह यांची ही भेट कौटुंबिक होती, राजकीय नाही. या भेटीत अमित शाह यांच्याबरोबर मनमोकळेपणाने चर्चा झाली. तसेच अमित शाह यांच्या जेवणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का?

अमित शाह यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली का? असा सवाल विचारला असता सुनील तटकरे यांनी या भेटीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. सुनील तटकरे म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठं काय चाललंय? हे माहिती असतं. अनेक व्यक्तिमत्वाबाबतची माहिती त्यांच्याकडे असते. शेवटी ते मोठे नेते आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ते आज त्या स्थानावर पोहोचलेत, याचा मला देखील अभिमान आहे. अनेकदा त्यांच्याशी संवाद साधताना देशातील राजकारणासह राज्यातील राजकारणाच्या खाचाखोचा माहिती होतात”, असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

गोगावलेंबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?

“भरत गोगावले आणि उदय सामंत, महेंद्र दळवी यांना आम्ही स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पण ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. माझं कर्तव्य होतं ते मी केलं. राजकारणाच्या पलिकडे एकमेकांचे परस्पर संबंध राहिले पाहिजेत. याबाबत मला इतर काही जास्त बोलायचं नाही”, असं सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.