Sunil Tatkare : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर २० दिवस झाले आहेत. पण तरीही महायुतीमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील काही नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे सुरु असल्याची चर्चा आहे. यातच काही दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात आपली जाहीर नाराजीही बोलून दाखवली आहे. तसेच छगन भुजबळ यांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही रोष व्यक्त केला. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं मोठं भाष्य छगन भुजबळांनी केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? भुजबळ पुढील भूमिका काय घेणार? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत असून याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तसेच छगन भुजबळांचा विषय गांभीर्याने सोडवला जाईल, असं सूचक विधानही तटकरे यांनी केलं. याचवेळी यापुढे पक्ष आणि पक्षाच्या शिस्तीला अधिक प्राधान्य देण्यासाठी पावलं उचलले जातील, असं सूचक भाष्यही तटकरे यांनी केलं. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या विधानाचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागे २००९ चा ‘तो’ प्रसंग? ‘या’ नेत्याने काय सांगितलं?

सुनील तटकरे काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “मी याबाबत समीर भुजबळ यांच्याशी बोललो होतो. सध्या छगन भुजबळ हे बाहेर आहेत, ते आल्यानंतर त्यांच्याशी या विषयांवर सविस्तर चर्चा होईल.” दरम्यान, अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर दिलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले, “अजित पवार हे भुजबळ यांच्याबाबत काय बोललेत? हे मला पाहूद्या. कारण कोणत्या वाक्याचा संदर्भ कुठे लावणं चुकीचं ठरेल. मला वाटत नाही की अजित पवार हे भुजबळ यांच्या संदर्भाने बोलले असतील. छगन भुजबळ हे जेष्ठ असल्यामुळे त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांच्या बाबतीतील विषय हा गांभीर्याने सोडवला जाईल”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

‘यापुढे पक्षाच्या शिस्तीला अधिक प्राधान्य’

सुनील तटकरे यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “यापुढे पक्ष आणि पक्षाची शिस्त याला अधिक प्राधान्य देण्याच्या पार्श्वभूमीवर अधिक पावलं उचलले जातील. तसेच मी जे वाक्य बोललो त्या वाक्याचा आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीचा काहीही संबंध नाही. मी जे म्हणतोय ते माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी आणि संघटनेतील कार्यकर्ते यांची पक्षाबाबतची शिस्त ही योग्य पद्धतीने राहिली पाहिजे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare on chhagan bhujbal ncp ajit pawar mahayuti politics to cabinet portfolio distribution gkt